खावलीत विजेचा शॉक लागून तीन म्हशींचा मृत्यू

सातारा : खावली ता. वाई येथे आज दुपारी 4.45 च्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यामुळे वीज वितरण कंपनीचे खांबावरील तार तुटल्यामुळे रानात गुरे चरण्यासाठी गेलेल्या तीन म्हसींचा तुटलेल्या तारेवर पाय पडल्याने शॉक लागून मृत्यू झाला. यामध्ये दोन म्हशी गाबन असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले.
घटनास्थळावर तातडीने पंचनामा करून शेतकरी सहदेव रामू शेलार रा. खावली ता. वाई यांच्या मृत झालेल्या म्हसीचा तलाठी एस.डी. धनवडे, मंडलाधिकारी गायकवाड तसेच वैद्यकीय अधिकारी विज वितरण कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, यांनी पंचनामा केलेला आहे.
यामध्ये तीनही म्हसीचे 1 लाख 15 हजाराचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात नमुद करण्यात आली आहे. अतुल म्हेत्रे यांनी झालेल्या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश महसुल यंत्रणेला दिले होते.
दरम्यान त्या प्रमाण आपद्ग्रस्त सहदेव शेलार यांचा जाब-जबाब नोंदवण्यात आला असून त्यांना वीज वितरण कंपनीच्यावतीने सानुग्रह अनुदान म्हणून सोमवार दि. 11 जुलै 2016 रोजी तातडीचे मदत देण्यात येणार आहे अशी माहितीही तहसिलदार अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.