किसनवीरच्या साई केंद्रात एक महिन्याचे उन्हाळी शिबिर

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या साई (स्पोर्टस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) केंद्राच्यावतीने एक मेपासुन एक महिन्याचेे उन्हाळी निवासी शिबीर 12 ते 16 वयोगटातील कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मल्लांसाठी आयोजित केलेले असून या शिबीरात सहभागी होऊ इच्छिणार्‍या मुलांनी 18 ते 28 एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन किसन वीर कारखाना कुस्ती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी दिली.
स्पोर्टस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने किसन वीर कारखान्यास साईचे केंद्र मंजूर केलेले असून किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच व्यायामाची सवय लागावी. त्या माध्यमातून युवा पिढी सक्षम व्हावी, यासाठी उन्हाळी सुट्टीत एक महिन्याचे निवासी शिबीर घेतले जाते. 30 मे अखेर चालणार्‍या या उन्हाळी शिबीरात सहभागी होणार्‍या शिबीरार्थीस सहा हजार रूपये फी आकारण्यात येणार आहे. या फीमध्ये शिबीरार्थीसाठी निवास, दोन वेळचे जेवण, अल्पोपहार आणि शिबीरासाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणासाठी मॅट, कुस्ती क्षेत्रातील तज्ञ उपलब्ध केले जाणार आहेत.
मर्यादित शंभर मुलांसाठी हे उन्हाळी शिबीर आयोजित केलेले असून प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे. या उन्हाळी शिबीरामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या मुलांनी आयडेंटी साईज दोन फोटोंसह दैनंदिन वापराच्या वस्तु बिछाना, ताट, वाटी, ग्लास, सरावासाठी शुज आदी वस्तू सोबत आणायचे असून अधिक माहितीसाठी निलेश डोंबे (9172767879) यांच्याशी संपर्क साधावा आणि या उन्हाळी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कुस्ती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष गजानन बाबर व सदस्यांंनी केले आहे.