कोरेगांव शहर लोकसहभागातून स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल ठरेल

नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे : प्रभाग 4 मध्ये खत निर्मितीची कार्यशाळा
कोरेगाव: कोरेगांव शहरातील प्रत्येक प्रभागात स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहिली असून यशस्वी लोकसहभागातून हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्यात अव्वल ठरेल असा विश्‍वास नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला आहे.
कोरेगांव नगरपंचायतीच्या वतीने प्रभाग 4 मधील ङ्गुलाई मंगल कार्यालय परिसरात आयोजित केलेल्या कंपोस्ट खत निर्मितीच्या कार्यशाळेत श्री. बर्गे बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी पुनम कदम-शिंदे, नगरसेवक महेश बर्गे, स्वच्छता दूत राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, मिलींद बर्गे, नगरपंचायतीचे कार्यालय अधिक्षक बाळासाहेब सावंत आदींची यावेळी उपस्थिती होती.
नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे पुढे म्हणाले, संपूर्ण शहर स्वच्छतेसाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली असून शहरातील प्रत्येक प्रभागात त्यासाठी मोठा उत्साह आहे, प्रत्येक प्रभागात आता मोठी चूरस निर्माण झाली असून विविध उपक्रमांमधून ही चळवळ अधिक व्यापक बनली आहे. त्यामुळे हे शहर नगरपंचायत विभागात संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर ठरेल असा विश्‍वास असल्याचेही ते म्हणाले.
प्रारंभी मुख्याधिकारी पुनम कदम-शिंदे यांनी उपस्थित महिलांना घनकचर्‍या पासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षीक दाखविले. हा उपक्रम प्रत्येक महिलेने आत्मसात करुन घरच्या घरीच खत निर्मिती करावी असे आवाहन करुन नगरपंचायतीने जे जे उपक्रम हाती घेतले ते यशस्वी करण्यासाठी निर्धाराने नेहमीच पुढाकार घेतलेल्या प्रभाग 4 मधील नागरिकांचे व या भागातील नगरसेवक महेश बर्गे यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब सावंत यांनी केले तर नगरसेवक महेश बर्गे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मिलींद बर्गे व विनायक पडवळ यांनी कंपोस्ट खत निर्मितीचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास भानुदास बर्गे, बापूसाहेब जाधव, अजित बर्गे, धनंजय भुजबळ, अशोक बर्गे, धनंजय पंडीत, प्रताप बुधावले, विकी जठार आदींसह विभागातील नागरिक, महिलांची उपस्थिती होती.