उत्तर कोरेगावात जनतेच्या भितीने लोकसेवक गायब

पिंपोडे बुद्र्रक , :(दिगंबर नाचण )संपूर्ण देशभर कोरोना व्हायरस मुळे लोक भयभीत झाले आहेत.त्यांना केंद्र व राज्य सरकाराच्या माध्यमातून आरोग्य,पोलीस,स्थानिक संस्था प्रशासन मदत करीत आहेत.पण सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव परिसरात जनतेच्या भितीने लोकसेवक गायब झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
राजकीय जागरूक असलेल्या या उत्तर कोरेगावात पायलीचे पन्नास युवा नेते,मार्गदर्शक,साहेब,दादा,भाऊ,नाना,आबा,तात्या,काका,भैया आहेत. वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस,यात्रा,सणासुदीला व निवडून आल्यानंतर या भागातील मालक झाल्यासारखे काही जण जनतेच्या वतीने शुभेच्छा देऊन भले मोठे बॅनर लावतात.काही जण उधारी बुडवून फटाके,हार -तुरे आणतात. अशी मंडळी तथा बोलघेवडे लोकसेवक गायब झाले आहेत.काही प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावून येत आहेत. त्यांचा मोठा आधार या भागातील गरीब लोकांना वाटू लागला आहे.
उत्तर कोरेगावातील नांदवळ,सोनके,सॊळशी,वाघोली,पळशी,बनवडी,आसनगाव,खेड,नांदगिरी,किन्हई व वाठार स्टेशन,पिंपोडे खुर्द,बुद्र्रक अशा अनेक गावात कोरोना संकटात सर्वजण सापडले आहेत. ग्रामस्थ सर्व नियमांची पालन करीत असून संकटाशी मुकाबला करीत आहेत.पण,गोर गरीब,शेत मजूर,हमाल,हातावर पोट असणारी अनेक कुटूंब मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.
धार्मिक,राजकीय मेळावे या भागात असले की,स्थानिक लोकसेवक दलालांच्या भूमिकेतून गर्दी करण्यासाठी टेम्पो,जीप,ट्रक पाठवून देतात.ज्यांच्याकडे कर्ज काढून घेतलेली दुचाकी आहे.अशा काही गरीब मंडळींना पेट्रोल पुरविले जाते.मात्र,आज गरज असताना कोणीही या भागात फिरकत नाहीत.गरिबांना मदत करण्याचा आदेश काका-बाबा देत नाहीत.भाऊ -नाना गाडी थांबवत नाहीत. तर बुवा,महाराज आपले दर्शन गरीब जनतेला होऊ नये म्हणून आपल्या राजवाडा,कुटीर,मठातून बाहेर पडत नाहीत.हे वास्तव्य सर्वांना समजले आहे.त्यामुळे राम भरोसे राहण्यापेक्षा काही दानशूर व्यक्तीच्या कार्यावर अनेक जण अवलंबून आहेत.त्यांना नशिबाने मदत मिळत आहे.हे संकट दूर झाल्यानंतर जे लोकसेवक गावभेटीला येतील. त्यावेळी त्यांना जाब विचारून हिशोब केला जाईल असा इशारा येथील स्वाभिमानी गरीब जनतेने दिला आहे. तसेच ज्यांनी मदत केली आहे.त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.