कोरेगांवला विकासात्मक दृष्टी देण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल : जिल्हाधिकारी 

कोरेगाव ः शासकीय जागा हस्तांतरणापासून ते शासनाच्या विविध योजना राबविण्यापर्यंत भरीव असे काम करुन कोरेगांव शहराला विकासात्मक दृष्टी देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल असा विश्‍वास जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी व्यक्त केला.
कोरेगांव नगरपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून शहरातील सर्व शासकीय जागा हस्तांतरणासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती, त्यानुसार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज कोरेगांव नगरपंचायतीला भेट देवून सर्व शासकीय जागांची पाहणी करुन संबंधीतांना हस्तांतरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या, त्यानंतर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरपंचायत प्रशासनाचे अधिकारी रविंद्र पवार, मुख्याधिकारी पुनम कदम, नायब तहसिलदार विठ्ठलराव काळे, श्रीरंग मदने आदींची यावेळी उपस्थिती होती.
श्रीमती सिंघल पुढे म्हणाल्या, कोरेगाव नगरपंचायतीने मागणी केल्याप्रमाणे ज्या जागा महसूलच्या ताब्यात आहेत, त्याबाबतीतला धोरणात्मक निर्णय तात्काळ घेवून हस्तांतरणाचा विषय मार्गी लावण्यात येईल, परंतु ज्या जागा जुन्या रेल्वेच्या मालकीच्या आहेत, त्यासंबंधीचे मार्गदर्शन केंद्र शासनाकडून मागविले जाईल. या शहरात अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जे जे प्रस्ताव नगरपंचायतीकडून येतील ते निश्‍चीतपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासन म्हणून सहकार्य करण्याचा प्रयत्न राहिल. वंचित आणि दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना प्रभावी राबविण्यासाठीही येणारे अडथळे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. नगरपंचायतीचे उत्पन्न स्त्रोत वाढविण्यासाठी, शहराच्या हद्द वाढीचा प्रश्‍न तसेच कर्मचार्‍यांच्या समायोजनासाठी जास्तीत जास्त सहकार्य राहिल असेही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या.
प्रारंभी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी स्वागत केले, मुख्याधिकारी पुनम कदम यांनी प्रास्ताविक केले तर उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक बाळासाहेब बाचल, महेश बर्गे, संजय पिसाळ, नितीन ओसवाल, नागेश कांबळे, सौ. संगिता बर्गे, सौ. शुभांगी बर्गे, सौ. मंदा बर्गे, किशोर बर्गे, सुनिल बर्गे, राहुल बर्गे, संतोष कोकरे, अमोल मेरुकर, गणेश येवले, दिपक फडतरे, राजेंद्र य. बर्गे, राजेश बर्गे, संतोष नलावडे, नगरपंचायतीचे कार्यालय अधिक्षक बाळासाहेब सावंत, अजित बर्गे, अमर सावंत, धनंजय भुजबळ, उध्दव घाडगे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.