वडूज : महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची दशा व व्यथा मांडणारा कोयता एक संघर्ष हा मराठी चित्रपट दिनांक 31 मे ला प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. वडूज येथील हॉटेल रवाईन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस अभिनेते रमेश राज यांच्या सह चित्रपटाच्या टीम मधील प्रस्तुतकर्ते विजय बागल, दशरथ गोडसे, श्री. बर्गे, शंकरराव माळी, शिक्षक बँकेचे माजी संचालक शशिकांत बागल, कृष्णत सुडके, संजीवनी माळी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेतन चव्हाण म्हणाले बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे या जिल्ह्यात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात प्रमुख कलाकारांमध्ये प्रकाश धोतरे, प्रियांका मलशेट्टी , रमेश राज, साक्षी आंधळे, असून या चित्रपटाचे निर्माते श्यामसुंदर बडे, सुर्यकांत बिराजदार, कृष्णा बडे, प्रशांत भोईर आहेत.
चित्रपटाचे प्रस्तुती श्रीयश एटंरप्रायजेसचे विजय बागल म्हणाले या चित्रपटात सुमित निसर्गंगंध, अमर कसबे, ज्ञानदेव भांडवलकर, सत्यप्रेम बडे, गोदाबाई बडे, गणेश बडे, रिया, पार्थ कराड, कृष्णा हातांगळे, सुनील मोराळे, सिद्धार्थ कांबळे, सुहासिनी चक्रे, श्रीमेसवाल, अमोल पवार, प्रमेश्वर देवकाते यांनी काम केले आहे. हे सर्व कलाकार बीड व इतर जिल्ह्यातील आहेत.
या चित्रपटात ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडल्या असून हा चित्रपट पूर्ण महाराष्ट्रात पोहचेल. 31 मे ला प्रदर्शित होणारा हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पहावा असे आव्हान ही त्यांनी यावेळी केले.प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ गोडसे यांनी आभार मानले.
खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यातील दिग्दर्शक चेतन चव्हाण, प्रस्तुतकर्ते विजय बागल, दशरथ गोडसे यांनी या चित्रपटाची पूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. तालुक्यातील जनतेने हा सत्य घटनेवरील चित्रपट आवर्जून पाहावे असे आव्हान ही त्यांनी केले आहे.