नियतीने मारले , पण ‘कृष्णा’ने तारले ; दोन्ही हात व पाय निकामी झालेल्या रूग्णावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये विनामोबदला उपचार

कराड: घरातील कर्त्या पुरूषाचा अपघात झाला तर अख्खे कुटुंबच कोसळून पडते. अशावेळी त्या अपघातग्रस्त रूग्णाला योग्य औषधोपचाराचा व मायेचा आधार मिळाला तर त्याची जखम भरून येतेच; शिवाय त्या कुटुंबालाही दिलासा मिळतो. अशीच काहीशी आशादायक घटना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये घडली आहे. वावरहिरे (ता. माण) येथील युवराज वसव यांना प्रचंड क्षमतेचा विजेचा शॉक बसल्याने त्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय निकामी झाले. पण कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने तब्बल साडेतीन महिने त्यांच्यावर विनामोबदला उपचार करून, माणुसकीचा नवा आदर्श घालून दिला आहे. कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचार्‍यांनी दिलेल्या आपुलकीच्या सेवेबद्दल युवराज वसव व त्यांच्या पत्नी उषा वसव यांनी नियतीने मारले; पण ‘कृष्णा’ने तारले, अशा आशयाचा उल्लेख हॉस्पिटलला दिलेल्या आभारपत्रात करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी, की माण तालुक्यातील वावरहिरे येथील रहिवासी असणारे युवराज वसव हे फॅब्रिकेशनची कामे करतात. साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एका साईटवर फॅब्रिकेशनचे काम करत असताना अचानक त्यांना उच्चक्षमतेचा विजेचा शॉक बसल्याने त्यांना मोठी शारिरीक इजा झाली. त्यांना तातडीने तिथल्याच एका स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण गंभीर शारिरीक इजेमुळे त्यांना 1 ऑगस्टपासून कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उच्चक्षमतेच्या विजेच्या धक्क्यामुळे त्यांचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हात आणि पाय निकामी झाल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला फार मोठा मानसिक धक्का बसला. शिवाय युवराज वसव हे घरात एकटेच कमावते असल्याने उपचाराच्या खर्चाचे काय करायचे, हा प्रश्‍न त्यांच्या पत्नी उषा वसव यांच्यापुढे आ वासून उभा ठाकला होता. याबाबत त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला कल्पना दिली असता, प्रशासनाने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले आणि विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार युवराज वसव यांच्यावरील सर्व उपचार विनामोबदला करण्याचा निर्णय घेतला. तसेच तब्बल साडेतीन महिने त्यांची विशेष काळजी घेतली.
नुकताच युवराज वसव यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांनी साडेतीन महिन्यात दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या नावे आभारपत्र लिहिण्याचा प्रयत्न केला. हातांची सर्व बोटे काढून टाकल्याने त्यांना लिहिणे शक्य होणार नव्हते. तरीही दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून त्यांनी हाताच्या प्लॅस्टरला पेन चिकटवून लिहिण्याचा प्रयत्न केला. पण अशाप्रकारे लिखाण करणे अवघड जात असल्याने अखेर त्यांनी त्यांच्या पत्नीला आपल्या भावना शब्दांकित करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टर्स व नर्सेसनी खूप चांगले उपचार केले. अगदी घरची व्यक्ती असल्यासारखी काळजी घेतली. वेळच्यावेळी इंजेक्शन, औषधे, ड्रेसिंग केले. कृष्णा हॉस्पिटलने एकही रूपया न घेता केलेल्या या उपचारांमुळे गेले तीन महिने मला हॉस्पिटलमध्ये नाही तर अगदी घरी व नातेवाईकांच्यात असल्यासारखे वाटले. डिस्चार्ज घेताना युवराज वसव व त्यांच्या पत्नी यांच्यासह हॉस्पिटलचे सारेच कर्मचारी भावूक झाले होते.
हाताच्या प्लॅस्टरला पेन चिकटवून लिहिण्याचा प्रयत्न!
कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांनी साडेतीन महिन्यात दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवराज वसव यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या नावे आभारपत्र लिहिण्याचा प्रयत्न केला. हातांची सर्व बोटे काढून टाकल्याने त्यांना लिहिणे शक्य होणार नव्हते. तरीही दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून त्यांनी हाताच्या प्लॅस्टरला पेन चिकटवून लिहिण्याचा प्रयत्न केला. पण अशाप्रकारे लिखाण अवघड जात असल्याने त्यांनी त्यांच्या  पत्नीला आपल्या भावना शब्दांकित करण्यास सांगितले.