कृष्णा काठच्या रहिवाशांचे सक्तीने स्थलांतर

वाईतील 150 कुटुंबाना हलविले सुरक्षित स्थळी
वाई : वाई तालुक्यात गेल्या आठ दिवसात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने धोम धारण परिसरात व कृष्णा नदीच्या पूर नियंत्रण क्षेत्रात राहणार्‍या जवळ पास वीस गावातील कातकडी, गोसावी,गोपाळ समाजातील कुटुंबाना व शेतकर्यांनी नदीकाठी बांधलेल्या जनावरांचे गोठे यांना प्रशासनाने सक्तीने स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांना ग्रामीण भागातील समाज मंदिरात तर शहरात शाळांमध्ये हलविण्यात आले आहे.नदीकाठच्या दहा गोठांचे सुध्दा स्थलांतर करण्यात आले आहे.अशी माहिती वाईचे तहसीलदार-अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.
शुक्रवारी दि.5 रोजी सायंकाळी सहा वाजता कृष्णा नदीतून दहा हजार क्युसेस पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याने नदी काठी पूर नियंत्रण रेषेत राहणार्‍या रहिवाशांना प्रशासनाने नोटीसा देवूनही ज्या रहिवाशांनी स्थलांतर केले नाही अशा नदी काठच्या दुतर्फा असणार्‍या धोम, भोगाव,मेणवली, वाईतील गंगापुरी,सिद्धनाथवाडी,ओझर्डे, सोनेश्वर, कडेगाव, आसले, भुईंज. पाचवड, चिंदवली, उडतारे, खडकी, कळंबे या गावातील रहिवाशांना सक्तीने स्थलांतर त्या-त्या गावातील समाज मंदिरे व प्राथमिक शाळांमध्ये सुरक्षित हलविण्यात आले.या कारवाईत तहसीलदार-अतुल म्हेत्रे,सर्व मंडलाधिकारी, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील,  कोतवाल यांचा समावेश होता.

 

नदी काठच्या गावांच्या सुरक्षतेसाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. धोम धरणातून जादा पाणी सोडल्याने वाई महागणपती मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे त्यामुळे नदीकाठी बघ्यांची मोठी गर्दी उसळली आहे.तीन वर्षात प्रथमच नदीला महापूर आल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.