कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज मोठा दिलासा दिला. कोर्टाचा निकाल भारताच्या बाजूने लागला असून कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. 15-1 च्या फरकाने हा निकाल लागला आहे. यापूर्वी 2017मध्ये आयसीजेने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती, त्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.
दक्षिण आशियाच्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांच्या माहितीनुसार, आयसीजेने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांना योग्य मानलेले नाही. 2 वर्षे आणि दोन महिने आससीजेमध्ये 15 सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज या प्रकरणावर निकाल देताना खंडपीठाने जाधव यांना काऊन्सेलर अ‍ॅक्सेस देण्याचाही आदेश दिला. तसेच पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी कोर्टाने दिला. दरम्यान, जाधव यांना कायदेशील मदत देण्यात यावी असेही कोर्टाने म्हटले आहे.
या प्रकरणात पाकिस्तानचे म्हणणे आहे की, हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च 2016 मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, भारताने पाकचा हा दावा नेहमीच नाकारला आहे. भारताने म्हटले आहे की, जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. त्यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानात आणण्यात आले होते. जाधव यांचा इराणमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करीत आयसीजेमध्ये खटला दाखल केला होता.
पाकिस्तानच्या एका लष्करी कोर्टाने देशात हेरगिरी करण्यास आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांखाली एप्रिल 2017 मध्ये जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आयसीजेने पाकिस्तानला सांगितले की, त्यांचा निकाल येईपर्यंत जाधव यांना देण्यात येणारी फाशीची शिक्षा स्थगित करावी.
भारताने आयसीजेकडे जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करीत त्वरीत सुटकेची मागणी केली होती. जाधव यांना दोषी ठरवताना आवश्यक प्रक्रियांचे पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने जराही पालन केले नसल्याचा आरोपही भारताने केला होता.
कुलभूषण यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटलेल्या सुषमा स्वराज खूश
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजुने निकाला लागला आहे. याबाबत, माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात ज्याप्रमाणे लढाई दिली, ती आजच्या निकालात महत्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निकालाचे मनपूर्वक स्वागत असेही सुषमा यांनी म्हटले आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने 15/1 अशा मतांनी विजय मिळवला आहे. कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्याचा आदेश आयसीजेने दिला आहे. कुलभूषण जाधव प्रकरणात भारताच्या बाजुने निकाल लागला आहे. त्यानुसार, कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. या निकालानंतर सुषमा स्वराज यांनी भारताचे वकिल हरिश साळवे यांचेही आभार मानले असून आपण अतिशय प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली. त्यामुळेच, याप्रकरणी भारताला विजय मिळाल्याचे म्हटले. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे कुलभूषण यांचे कुटुंब नक्कीच आनंदी असेल, असेही स्वराज यांनी म्हटले आहे.
जाधव यांच्या मित्र परिवाराकडून जल्लोष
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवल्याने संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, मुंबईतील कुलभूषण यांच्या मित्रपरिवारानेही कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष केला. रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून आणि एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी आनंद व्यक्त केला.
कुलभूषण जाधव यांच्या गावी जल्लोष
सातारा : आनेवाडीचे भूषण ठरलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयातून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे आनेवाडी ग्रामस्थांनी साखर वाटून व फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
हेरगिरी प्रकरणी पाकच्या लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेल्या 49 वर्षीय भारतीय नौदलाचे माजी अधिकारी व सातारा जिल्ह्यातील आनेवाडी गावचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांच्यावरील आरोपांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेल्या सुनावणीवर निकाल आला. त्यामुळे सकाळपासून ग्रामस्थांना याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. सर्वांच्या नजरा निकालाकडे असल्याने सर्व कामधंदे बंद ठेऊन पूर्णतः या निकालाकडे लक्ष ठेऊन होते. बुधवारी सायंकाळी याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्यांच्यावरील पाकिस्तानने ठोठावलेल्या शिक्षेस स्थगिती दिल्याच्या निकालाची माहिती मिळताच आनेवाडी ग्रामस्थांनी आनेवाडी फाट्यावर फटाक्यांची आतषबाजी करीत साखर वाटप करत भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबदच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आनेवाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. भुईंज पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.