कूपर कॉलनी येथील धाडसी वयोवृध्दांचा सत्कार

साताराः शहरातील प्रतिष्ठित व शिस्तबध्द अशा कूपर कॉलनीमध्ये दि. 15 नोव्हेंबर 2018 रोजी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सर्व हत्यारानिशी आलेल्या किंमती ऐषारामी कारसह दोन परप्रांतीय टेहळणी करीत होते. त्यापूर्वी या कॉलनीत सायंकाळच्या वेळी दोन घरफोडया झाल्या होत्या. त्यामुळे या परप्रांतीयाबद्दल संशय घेवून या कॉलनीतील साठीतील सहा धाडसी वयोवृध्दांनी प्रसंगावधान राखून धोका पत्करून या चोरटयांचा पिच्छा पुरवला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणेशी तातडीने संपर्क साधला. हत्यारबंद चोरटे आक्रमक होवून कारसह पलायन करण्यापूर्वी त्यांचे कारसह फोटो घेतले. ते पोलीसांना व संबंधितांना तातडीने पाठविले व कारची चावी काढून घेतली. पोलीस येण्यापुर्वी चोरटे पसार झाले. कॉलनीतील सर्वासमक्ष चोरटयांची हत्यारबंद कार आतील चीजवस्तूंसह पोलीसांच्या रितसर ताब्यात दिली. त्यामुळे होवू घातलेला अनर्थ दरोडा टकला व या चोरटयांना पकडणे पोलीस यंत्रणेला सुसह्य झाले.
या धाडसी वयोवृध्दांमध्ये मोहनराव जाधव, राजन बापू धुमाळ, पृथ्वीराज पवार, मुकूंदराव मोघे, प्रशांत गरगटे, प्रकाश मोहिते यांचा समावेश होता.
पोलीस यंत्रणेशी केलेल्या या धाडसी सहकार्याबद्दल सातारा येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख (भापोसे), नारायण सारंगकर, राजेंद्र यादव इत्यादींनी वयोवृध्दाचा सत्कार केला. व समाजाप्रती असलेली त्यांची संवेदना व्यक्त केली.