सातार्‍यात दिवंगत पत्रकार पांडुरंग पवारांची ‘लेक’ चालली सासरला ; धावडशीत लग्न सोहळा संपन्न

 

सातारा दि : सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेसोबतच फिजिकल फिटनेस राखून काम करणारे धावपट्टू व  पत्रकार पांडुरंग पवार यांचे गेल्या वर्षी मे महिन्यात अपघाती निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह अनेक मित्रपरिवार शोकाकूल झाले होते. त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला असला तरी त्यांची कन्या प्रगती हिच्या लग्नाची जबाबदारीही पार पाडण्यात आली. काल नातेवाईक व भावकी आणि पत्रकार अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थित  धावडशी या ठिकाणी भावनिक वातावरणात लग्न सोहळा पार पडला. यावेळी अनेकांना पत्रकार पवार यांच्या आठवणी ताज्या झाल्या.

परमपूज्य ब्रम्हेंद्रस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धावडशी येथूून सुमारे २२ वर्षांपूर्वी पांडुरंग पवार हे सातारा शहरात आले होते. पत्रकारितेचा कोणताही गंध नसतानाही त्यांनी पोवई नाका येथील दैनिक महासत्ताच्या कार्यालयातून पत्रकारितेचा शुभारंभ केला. पत्रकारितेला लागणारे गुण त्यांनी स्वयंस्फूर्तीने आत्मसात केले होते. बातमीसाठी भ्रमंती, मुद्दे लिहिणे, मराठीत बातमी टंकलेखन करणे, पानात बातमी लावणे, पान सोडणे व त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी पेपरचे पार्सल घेऊन ते वितरण करणे त्याचबरोबर अंकाची वसूली करणे असे चौफेर काम करत असल्यामुळे अनेक माणसे जोडता आली. ही पत्रकारितेची बाजू सांभाळणार्‍या पांडुरंग पवार यांनी फिजिकल फिटनेस राखून अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. गोवा, हैद्राबाद, पुणे, मुंबई या ठिकाणी धावपट्टू म्हणून सहभाग घेत असताना सातार्‍यातील मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे होम पिच ठरले होते. शासकीय पातळीवर पत्रकारितेचा पुरस्कार मिळविणार्‍या पांडुरंग पवार यांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक पदक मिळवले होते. गेल्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर सातार्‍यातील सर्वच स्थरातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे पवार कुटुंबिय सावरले. नातेवाईकांची मदत झाली.

मंगळवार दि.१९ मे रोजी दु.३.४५  वाजता धावडशी या ठिकाणी घरातील टेरेसवर कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून पत्रकार पांडुरंग पवार यांची कन्या चि.सौ.का. प्रगती व नेले किडगाव ता. सातारा येथील सुमित जाधव यांचा घरगुती पध्दतीने लग्न सोहळा झाला. या लग्न सोहळ्याला मोजकीच मंडळी उपस्थित असली तरी अनेकांनी आशिर्वाद व शुभेच्छा देवून दिवंगत पत्रकार पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी खारीचा वाटा उचलला होता. या लग्न सोहळ्याला पांडुरंग पवारांची पत्नी श्रीमती सविता पवार, चिरंजीव ओंकार पवार, वडिल नामदेव पवार, आई सौ.सुशिला पवार, संदिप शेडगे तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर तसेच नातेवाईक,भावकीतील मोजकेच मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार पांडुरंग पवार यांच्या अपघाती निधनाने पत्रकारांच्या कुटुंबातील जगण्याचे वास्तव सामोरे आले होते. त्यांची जाणीव ठेवून अनेकांनी आर्थिक हातभार लावला. त्यामुळे दहा लाख रूपयांच्या अनामत रकमेच्या व्याजातून कुटुंबाचा गाडा चालवण्यात येत आहे. काहींनी मानसिकरित्या धीर देवून या कुटुंबाला आधार दिला खर्‍या अर्थाने पत्रकार पांडुरंग पवार यांनी केलेल्या कार्याची त्यांच्या पश्‍चात दखल घेवून मित्रपरिवाराने आनंद सोहळा साजरा करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या कन्येला आशिर्वाद दिला आहे.

खर्‍या अर्थान पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांसाठी समाज पुढे येतो. तसेच इतरांना मदत करण्यासाठी धावणार्‍या पत्रकराबद्दल समाजामध्येही जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा लग्न सोहळा मैलाचा दगड ठरू अशा शब्दांत हेमंत कदम, सुनिल शिवदे, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप,उमेश भांबरे, राजकुमार पाटील,महेश पवार, विजय पाटील, सातारा टुडेचे संपादक संग्राम निकाळजे, सुजीत आंबेकर, डॅनियल खुडे, अजय कदम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.