लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली प्रकरणे पक्षकारांनी सामोपचाराने मिटवावीत : आर. एन. लढ्ढा 

सातारा :  प्रलंबीत प्रकरणे व वादपूर्व अशा दोन प्रकारच्या एकूण 1 लाख प्रकरणे आज  होणार्‍या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आली आहे, पक्षकारांची  आपली जास्तीत जास्त प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सामोपचाराने   मिटवावीत, असे आवाहन प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी केले.
आज येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव वर्षा पारगावकर यांच्यासह न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.
दि.9 डिसेंबर रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने जिल्हा न्यायालयात 21 पॅनल तयार करण्यात आले आहेत. जिल्हा न्यायालयात 1 लाख प्रकरणे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रलंबीत व वादपूर्व प्रकरणांचा समावेश  आहे. पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावीत, असे आवाहनही प्रमुख सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी शेवटी केले.
आज राष्ट्रीय लोकअदातीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा फायदा जास्त करुन पक्षकारांना होणार आहे.  आज होणार्‍या राष्ट्रीय लोकअदालतीत सर्वांनीच उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.पक्षकारांनी या  लोकअदालतीचा लाभ घेवून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावेत, असे विधी प्राधिकरणाच्या सचिव वर्षा पारगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये  न्यायालयातील सर्व प्रकारची प्रलंबित पकरणे म्हणजे सर्व दिवाणी व फौजदारी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन नुकसान भरपाईची प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस क्ट च्या कलम 138 खाली दाखल झालेली प्रकरणे, महसूल बाबतची प्रकरणे, कामगार वाद, वन कायदा व इतर सर्व तडजोडपात्र प्रकरणे, थकीत बिले वसुली प्रकरणे इ. प्रकरणांबाबत तडजोड करण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.यावेळी वकील, न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.