‘लोकशाही पंधरवडा’ उत्साहात साजरा करा ; राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हा परिषदेला आदेश

सातारा : लोकशाही, निवडणुका व सुशासन या विषयी निरंतर शिक्षणाची गजर असल्याचे लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाकडून दि. 26 जानेवारी ते दि. 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा दिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही तो साजरा करण्यात येणार असून तो कशाप्रकारे साजरा करण्यात यावा, याची माहिती शुक्रवारी सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी सांगण्यात आले की, देशाच्या विकास प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे महत्त्व, स्थान व भूमिका अधोरेखित करण्यात यावी. राज्य निवडणूक आयोग शासनापेक्षा स्वतंत्र असल्याची जाणीव करुन देणे त्याचबरोबर लोकशाहीचे संवर्धन, संरक्षण आणि बळकटीकरण करण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य निवडणूक आयोग आणि शासनाबरोबरच सर्वांचीच आहे. यासाठी व्यापक कार्यक्रम करायचे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने गेल्या दोन ते तीन वर्षांत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांच्या निवडणुकांचे महत्त्व याबाबत सर्व स्तरावरील अधिकारी व पदाधिकारी यांना अवगत करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे सर्व काळजी व दक्षता घेणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संशोधन करणे, राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जाद्वारे अठरा वर्षे पूर्ण झाल्याबरोबर मी माझे नाव मतदार यादीत नोंदवून घेणार आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र घेण्यात यावे त्याचबरोबर विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या सर्व विषयांसाठी लोकशाही निवडणूक व सुशासन हा विषय अनिवार्य करणे, आदी निश्चित करण्यात आले आहे.
लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर सर्वसामान्यांसाठी सतत शिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच लोकशाही पंधरवड्यामध्ये जागरुक मतदार, लोकशाहीचा आधार हा विषय आधार मानून लोक जनजागृती संदर्भात कार्यवाही करावी. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पंचायत समित्या, सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे नियोजन करुन ग्रामसभेमध्ये लोकशाही पंधरवडा उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात यावे. लोकशाही, निवडणूक व सुशासन व 73 व 74 वी राज्यघटना दुरुस्ती या विषयांवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. तसेच प्रभातफेरींचे आयोजन करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही, निवडणूक व सुशासन यांचे महत्व व संस्थांचे नेमके स्थान व भूमिका याबाबत माहिती देण्यात यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.