लोणावळ्यापासून कोल्हापूरपर्यंत विशेष दक्षता पथके

महामार्ग सुरक्षा सक्षमीकरणाचा नांगरे-पाटलांचा नवा फंडा
सातारा : कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी महामार्ग सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी महामार्ग बीट तयार करण्यात येणार असून प्रत्येक दहा मिनिटाला एक पोलिसांची गाडी दिसली पाहिजे यासाठी लोणावळयापासून ते कोल्हापूरपर्यंत टीम्स तयार करण्यात येणार आहे. तसेच महिला सुरक्षिततेसाठी स्पेशल टीम तयार करणे, महिला पोलिस कर्मचार्‍याने तपास देणे, पोलिस कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी शाळा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत विविध मुद्यावर श्री. नांगरे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. पोलिस कर्मचार्‍यांशी संवाद साधल्यानंतर औरंगाबादच्या धर्तीवर पोलीस शाळा उभी करण्याची मागणी आली असून त्यादृष्टीने काय प्रयत्न करता येईल हे बघणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी प्लेसमेंट सेंटर मुंबईच्या धर्तीवर प्लेसमेंट सेंटर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी महामार्ग आणि जिल्हयातील प्रमुख रस्ते सुरक्षित असणे गरजेचे आहे. हे दोन्ही सुरक्षित असतील गुन्ह्यांवर नियंत्रण येते त्यामुळे लोणावळयापासून कोल्हापूरपर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत जादा असणारी वाहने पेट्रोलिंगसाठी वापरण्यात येणार असून प्रत्येक दहा मिनिटाला पोलिसांची गाडी दिसेल अशा पध्दतीने रचना करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग बीट तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला, युवतींवर अत्याचारात वाढ होत असून महाविद्यालयाच्या परिसरात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी पाच अधिकारी कार्यशाळेसाठी गेले असून ते लवकरच परतणार आहेत. ते आल्यानंतर एक टीम तयार करण्यात येणार असून त्या 100 महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना लगेचच प्रत्यक्ष कामास सुरुवात करा असे सांगण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणावरुन तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी हे सवर्हे करणार असून त्यांच्याकडे छुपे कॅमेरेही असणार आहेत. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिला पोलिस कर्मचार्‍यांकडून आम्हाला तपासाचे काम देण्याचे मागणी होत असून त्यांच्याकडे सुरुवातीला महिला अत्याचाराचे गुन्हे देण्यात येतील. त्यामुळे तक्रार देणार्‍या महिलांना माहेरघराचा अनुभव आला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बेकायदेशीर फ्लेक्सबाबात त्यावर असणार्‍या नावांची यादी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भयमुक्त वातावरणासाठी पोलीस दल प्रयत्न करणार आहे. तडीपार झालेल्यांची तडीपारी रद्द होऊ नये यासाठी चुका राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाईबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दर महिन्याला आढावा घेणार असून हे कौतुकास्पद पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमाप्रमाणे वेळेवरच दुकाने बंद होतील याकडे लक्ष राहणार आहे. गुन्हयाच्या चक्रात अडकू नयेत यासाठी त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालयात स्वयंसेवी संस्थांच्यावतीने प्रशिक्षण, जनजागृती करण्यात येणार आहे. महिलांवर अत्याचार केल्यास काय शिक्षा होऊ शकते याबाबतही माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक नागरिक गणवेश रहित पोलीस असून तरुणांना योग्य मार्गावर रहावे साम, दाम, दंड, भेद वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटनस्थळी येणा-या पर्यटकांना गुंडगिरीचा त्रास होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी पोलीस आहेत हे पोलिसांच्या वागणुकीतून कसे दिसेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील त्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदारांना पोलीस कंट्रोल रुममधून प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पोलीस दलामध्ये वर्तुणक आणि वागणुकीबाबत सकारात्मक पाऊल उचलण्यात येणार आहे. कार्यक्षमता आणि प्रतिमा सुधारण्यासाठी, सर्वसामान्यांना पोलिसांची भीती वाटणार नाही अशी व्यवस्था करु त्याचबरोबर गुन्हेगारांना पोलिसांचा वचक असेल अशा पध्दतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी 38 मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर चार्जशीट दाखल करताना कोणतीही कमतरता राहू नये यासाठी पोलिस अधिका-यांनी सत्यनिष्ठता भूमिका घ्यावी असेही त्यांनी सांगितले. आयसिस, नक्षलवाद, दहशतवादाच्या प्रभावाखाली कोणीही येऊ नये यासाठी पोलिसांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या शासनाने तपासणीसाठी भरपूर प्रमाणात निधी दिला असून त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकाची आहे. अवैध धंद्यावर वारंवार कारवाई होते परंतु पुन्हा ते धंदे आहे तसेच सुरु राहतात हे चक्र थांबावे यासाठी नागरिकांमध्ये जागृती करुन त्यांना पोलीस यंत्रणेचे भागीदार करणे गरजेचे आहे. येत्या 15 ऑगस्टला होणा-या ग्रामसभेत गावातील अवैध धंदे बंद व्हावेत असा ठराव करण्यात येणार असून गावाने ठरवले तरच हे अवैध धंदे बंद होऊ शकतात. सायबर क्राईमबाबत सर्व पोलिस मुख्यालयाच्या ठिकाणी अद्यावयत लॅब करण्याचे काम प्रगतीपथावरर असून 15 ऑगस्टला त्याचे उद्घाटन होणार असल्याचेही श्री.नांगरे-पाटील यांनी सांगितले. साता-यातील लॅबसाठी 60 लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. भविष्यकाळात सायबर क्राईम हेच मोठे आवाहन आहे. खासगी सावकारीचा प्रश्न पोलीस अधीक्षक गंभीरपणे हाताळत असून तक्रारदारांनी तक्रार दाखल करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येबाबत सी.आय.डी.कडे असलेला तपास योग्य दिशेने सुरु असून लवकरच निकाल मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारण्यांनी चांगल्या गोष्टीसाठी दबाब आणला पाहिजे चुकीच्या गोष्टीसाठी दबाव आणे अयोग्य आहे. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचाराबाबत प्रत्येक महाविद्यालयात जाऊन जनजागृती करण्यात येणार असून स्लाईड शोच्या माध्यमातून युवकांनाही महिलांवर अत्याचार केल्यास कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात याबाबत माहिती दिली जाणार आहे जेणेकरुन महिला अत्याचारास आळा बसेल असेही श्री. नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.