शिकेकाईची अवैधरित्या वाहतूक करणारी टोळी जेरबंद

महाबळेश्वर : अवैधरित्या राखीव वनातून शिकेकाई गोळा करून तिची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या टोळीस अत्यंत शिफातीने सापळा रचून महाबळेश्वर वनखात्याने सुमारे 3 लाख 45 हजारा चा मुद्दे माल हस्तगत केला आहे . दरम्यान या मागे वन उत्पादने यांची खरेदी विक्री करणारी मोठी टोळी असावी असा दाट संशय वनखात्याला येत असून त्या दृष्टीने तपास सहाय्यक वनसंरक्षक के.एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड करीत आहेत .
महाबळेश्वर वनक्षेत्राच्या हद्दीतील राखीव वनातून अवैधरित्या शिकेकाई व अन्य वन उत्पादने गोळा करून तिची अवैधरित्या वाहतूक महाबळेश्वर येथील प्रतापगड घाटातून केली जात असल्याची गुप्त खबर महाबळेश्वर वनखात्यास मिळाली. महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांनी तातडीने त्यानुसार येथील महाड नाका येथे मंगळवारी दि 12 मार्च रात्रौ 8:30 वाजता वनपाल एस.एम. शिंदे , वनरक्षक डी.बी. सोरट, ए . व्ही. पाटील, ए.डी. कुंभार, बी.टी.वडकर यांच्या मदतीने सापळा रचून नाकेबंदी केली असता तेथे वनखात्याला चक-11–ॠ-4076 या महिंद्र पिक अप वाहनामधून अवैधरित्या शिकेकाई ची वाहतूक अक्षय कारंडे, अमोल कारंडे तसेच जयंत चव्हाण हे करीत असल्याचे निदर्शनास आले. तातडीने गाडीसह मुद्देमाल व संशयीतांना ताब्यात घेवून तपास केला असता अक्षय कारंडे (वय 22), अमोल कारंडे (वय 27) दोघे रा.वाडा कुंभरोशी (प्रताप गड पायथा) व वाहन चालक जयंत आनंदा चव्हाण(वय 32,) रा.पांडेवाडी ता.वाई हे तिघे शिकेकाईची सुमारे 55 पोती घेवून वाई येथील व्यापार्‍याला विकण्यास चालले होते. वनाधिकार्यांनी तातडीने अक्षय कारंडे (वय 22), अमोल कारंडे (वय 27) दोघे रा.वाडा कुंभरोशी (प्रताप गड पायथा )व वाहन चालक जयंत आनंदा चव्हाण(वय 32)रा.पांडेवाडी ता.वाई यां तिघांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41-1,2 (बी) अन्वये गुन्हा दाखल केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. मुद्देमाल 55 पोती शिकेकाई , वाहतूक करण्यासाठी वापरली जाणारी चक-11–ॠ-4076 हि महिंद्र पिक अप गाडी तसेच या गुन्ह्यात टेहळणी साठी वापरली गेलेली अ‍ॅकटीव्हा स्कूटी असा एकूण सुमारे 3 लाख 45 हजारा चा मुद्दे माल हस्तगत करून जप्त केला आहे. दरम्यान वन गुन्ह्याच्या चौकशी मध्ये मिळालेली माहिती अशी कि वरील तिघे आरोपी महाबळेश्वर वनक्षेत्रातील प्रतापगड राखीव वनातून शिकेकाई गोळा करून ते वाई येथील व्यापारी मे.एस. एम. ट्रेडर्स, धर्मपुरी वाई यांना देत असत आणि ते त्याची विक्री करीत असत.
यापूर्वी या आरोपींनी त्याला माल पुरविला होता. आज हा संपूर्ण माल तेथेच चालला होता. आरोपी यांनी दिलेल्या माहिती नुसार महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांनी तातडीने आपले सहकारी वनक्षेत्रपाल फिरते पथक संदीप गवारे, वनपाल राजापुरे, शिंदे, वनरक्षक घेवारी यांना बरोबर घेवून त्यांच्या पथकाने वाई येथील वरील व्यापारी- मे.एस. एम. ट्रेडर्स (धर्मपुरी वाई ) येथे धाड टाकून तेथे अवैधरित्या विना परवाना साठवणूक करून ठेवलेले एक शिकेकाई चे पोते तसेच एक पोते हिरडा अशी वन उत्पादने असलेली दोन पोती जप्त करून ताब्यात घेतली. तसेच सहाय्यक वनसंरक्षक के.एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे वाडा कुंभरोशी (ता.महाबळेश्वर) येथे हि दोन ठिकाणी धाडी टाकून तेथून अवैधरित्या बाळगलेली शिकेकाई, वावडूंग, जेष्ठमध, रान हळद, कुडा असा माल व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. सदर छापापथकामध्ये वनपाल एस. के. नाईक, एस. एम. शिंदे, वनरक्षक वनपाल एस.एम. शिंदे ,वनरक्षक डी.बी.सोरट , ए . व्ही. पाटील, ए.डी. कुंभार, बी.टी.वडकर, आर .एन. गडदे, कु .व्ही. एस. घारगे, कु. जे. आर. घारगे यांचा समावेश होता . सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक के.एस. कांबळे, महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महाबळेश्वर एस. के. नाईक करीत आहेत.
दरम्यान महाबळेश्वर परिसर ईको सेन्सिटिव्ह झोन व पर्यावरण दृष्ट्या संवेदन शील असल्यामुळे वनांमधून अवैधरित्या वन उत्पादने गोळा करून त्याची अवैधरित्या वाहतूक करून त्याची विक्री करणारे तसेच वन्यजीवांची हत्या करून त्याच्या अवयवांची विक्री करणार्‍या चे धाबे चांगलेच दणाणलेले आहे व त्यांच्यात घबराट निर्माण झाली आहे.