रक्षणकर्त्या पोलिसांच्या काळजीने अनेक कुटूंब व्यथित

सातारा (अजित जगताप): कोरोना विषाणू संसर्ग थोपविण्यासाठी राज्यभर आरोग्य, महसूल व पोलीस विभाग सक्रिय सहभाग घेत आहेत. आतापर्यंत राज्यात १००१ पोलीस बांधवाना कोरोना लागण झाली असून ८ जणांचे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलीस बांधवांचे कुटूंब व्यथित झाले आहेत.
गेली दिड महिना देशभरात कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी निकाराचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या मध्ये पोलीस व आशा, अंगणवाडी सेविका या फिल्ड वर जाऊन कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सुविधा मिळत नसली तरी त्यांनी कधी ही तक्रार केली नाही. सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी संरक्षक मास्क वाटप करून सातारा पोलिसांना दिलासा दिला आहे. तर पोलिसांनी सुध्दा पदरमोड करून लॉक डाउन मध्ये अडकून पडलेले गरीब व परप्रांतीयांना जेवण, नाष्ठा व पाणी पुरवठा करून माणुसकी जपली आहे.तसेच त्यांच्या सुरक्षित प्रवासाची ही काळजी घेतली आहे. असे असतानाही सातारा जिल्ह्यातील पोलीस बांधवांनी त्याची जाहिरातबाजी केली नाही.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी व कराड अशा तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकरी व ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी तसेच वाई, खंडाळा, खटाव, सातारा, कोरेगाव, माण, फलटण तालुक्यातील पोलीस साप्ताहिक सुट्टी न घेता कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे कुटूंब काळजीत असले तरी आधी लढाई कोरोना शी व नंतर इतर गोष्ठी अशी धारणा पोलिसांची झाली आहे. त्यामुळे शहर,गाव, वाड्या-वस्ती विखुरलेल्या पोलीस बांधवांच्या कुटूंबाला पाणी, किराणा व इतर आवश्यक वस्तू स्वस्त व घरपोच देण्यासाठी स्थानिक पातळीवर पुढाकार घेणे गरजेचे आहे.
आरोग्य, पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यापेक्षा समाज्याने त्यांना मदतीचा हात देऊन माणुसकी जपणे सध्या आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. अशा आरोपींचे वकील पत्र वकिलांनी घेऊ नये तसेच त्याला जामीन दार होऊ नये तरच हे हल्ले थांबतील अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जगताप, महारुद्र तिकुंडे व पोलीस मित्र संदिप इंगवले यांनी केली आहे.
परिसरात बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या पोलिसांना मेडिकल दुकानदार यांनी मोफत सिनेटिझर व मास्क वाटप करून त्यांना सोबत असल्याचा विश्वास दयावा. तसेच पोलीस बांधवाना खरेदी करण्यासाठी दुकानात आल्यास त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक असल्यास संबंधितांनी शारीरीक अंतर ठेवूनच पोलीस ठाण्यात संपर्क साधावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.