महाशिवरात्रीला जिल्ह्यात गजर शिवनामाचा

सातारा : त्रिनेत्रधारी भगवान शंकराच्या भक्तीचा महिमा वर्णन करणारा महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात मंगळवारी संपन्न झाला.
महाशिवरात्रीनिमित्त विविध शिवमंदिरात शिवलिंगास महाभिषेक, विशेष पूजा, रुद्रावर्तन, स्तोत्र पठण, महाआरती व प्रसाद वितरण कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सातारा शहर परिसरातील संगम माहुली, पाटेश्‍वर देगाव, नटराज मंदिर, कुरणेश्‍वर देवस्थान, यवतेश्‍वर, सिध्देश्‍वर कुरोली, शिखर शिंगणापूर, यासह शहरातील काशी विश्‍वेश्‍वर, अमृतेश्‍वर, गणकेश्‍वर, मुदगलेश्‍वर, राजेश्‍वर, कोटेश्‍वर, कृष्णेश्‍वर आदी मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मंदिराच्या प्रांगणात पांढरी फुले, पुष्पहार, बेल पाने, श्रीफळ, भस्म, कापूर, उदबत्त्या आदी पूजा साहित्य विक्रीचे स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी दिसून येत होती. अनेक मंदिरातील उत्सव समितीच्या वतीने महाप्रसाद, भंडार्‍याचे आयोजन केले होते. हर हर महादेवच्या जयघोषात अनेक मंदिरांवर लाउडस्पिकरवरुन शिवमहिमा वर्णन करणारी भक्ती गीते लावून परिसरात धार्मिक वातावरण निर्माण केले होते.