सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचारार्थ पाटण शहरात महिलांचा महा एल्गार

पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर (दादा) आणि सातारा लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ पाटण शहरातून काढलेल्या पदयात्रेला महिलावर्गातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत पाटण शहरातील युवती, महिला मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या.
पाटण शहराच्या इतिहासात प्रथमच महिला ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचारार्थ रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. पदयात्रेत महिलांनी सत्यजितसिंह पाटणकरच आमदार आणि श्रीनिवास पाटीलच खासदार असा एल्गार करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी उपस्थित महिलांनी भाऊबीजेच्या मतांची ओवाळणी सत्यजितदादांना आमदार रूपाने देऊयात. असा ठाम निर्णय यावेळी केला.
महिलांची पदयात्रा रामापूरमार्गे नवीनबसस्थानक, झेंडाचौक, व्यापारीपेठ, लायब्ररीचौक मार्गे राजवाडा अशी काढण्यात आली. सत्यजितसिंह पाटणकर यांचा विजय असो, एकच वादा सत्यजितदादा, सत्यजितदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण म्हणतंय येत न्हांय आल्याशिवाय रहात न्हांय. किती बी ताण येत न्हांय बाण अशा जोषपूर्ण घोषणांनी पाटण शहर दणाणून गेले होते. पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने पदयात्रेचे स्वागत करण्यात येत होते. मी सत्यजितसिंह, मी पाटणकर अशा टोप्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे हाती घेतलेल्या महिलांनी पदयात्रेत मोठी गर्दी केली होती. पदयात्रा पाटणकर यांच्या शिक्का मॅन्शन वाड्याजवळ आली असता तेथे पदयात्रेचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
याप्रसंगी बोलताना सौ. शिलादेवी अमरसिंह पाटणकर म्हणाल्या, आज सर्वत्र विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. मात्र आता ती परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. सत्यजितसिंह पाटणकर यांना आमदार म्हणून विधानसभेत आणि श्रीनिवास पाटील यांना खासदार म्हणून लोकसभेत सन्मानाने पाठवुयात. आज शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवत आहेत. त्यांना आपण सर्वांनी साथ करूयात. विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजितसिंह दादांनी केलेली कामे तालुक्याने पाहिली आहेत. दादांनी उभे केेलेले उद्योगधंदे, व्यवसाय निर्मिती, रोजगार निर्मिती, केलेला विकास प्रत्येकाने महिलांपर्यंत पोहोचवावा. गेल्या पाच वर्षात तालुक्याचा खुंटलेला विकास पूर्ववत करण्यासाठी राष्ट्रवादीला प्रचंड मतांनी निवडून देऊयात, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिलादेवी पाटणकर, सुषमा महाजन, रश्मी राऊत, सोनल फुटाणे, जवारी मॅडम, पाटोळे मॅडम, मोटे मॅडम यांच्यासह इतर महिलांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना निवडून आणण्याचा आपल्या भाषणात एल्गार केला. या पदयात्रेत पाटण शहरातील तमाम महिला, युवती, ज्येष्ठ महिला, नगरसेविका, पंचायत समितीच्या आजी-माजी सदस्या मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या.