मल्हारपेठ ग्रामपंचायतीत आ. देसाई गटाला दणका ; हर्षद कदम यांच्या पत्नी धनश्री कदम सरपंच ; आ. नरेंद्र पाटील यांच्या गटाचाही पराभव

पाटण : –  तालुक्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या आ. शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यातील मल्हारपेठ, नारळवाडी व ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे ग्रामपंचायतींमध्ये धक्कादायक निकाल लागले असुन मल्हारपेठ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले.  याठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या सुविद्य पत्नी धनश्री कदम यांनी सरपंचपदी बाजी मारली. मल्हारपेठ ग्रामपंचायतीत ११ पैकी पाटणकर गटाने ७ व देसाई गटाने ४ जागांवर विजय संपादन केला. येथ आ. शंभुराज  देसाई गटाला बाल्लेकिल्यात पराभवाचा दणका बसला. तर मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीत कॉंग्रेसचे हिंदूराव पाटील यांनी सत्तांतर घडवून आ. नरेंद्र पाटील व त्यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांना जबरदस्त धक्का देत ढेबेवाडी विभागात कॉंग्रेसची ताकद दाखवून दिली. नारळवाडी ग्रामपंचायतीत पाटणकर गटाने सत्तांतर घडवून आ. देसाई यांच्याकडून ग्रामपंचायत हिसकावून घेतली. या झालेल्या निवडणुकीत देसाई गटाला ४, कॉंग्रेसला २, राष्ट्रवादी १ व शिवसेनेचे हर्षद कदम यांना १ ग्रामपंचायती मिळाल्या.

           दरम्यान २०१९  साली होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यात पडलेल्या खिंडाराने देसाई गट  हतबल झाला असून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेला शह शंभूराज देसाई यांना महागात पडला.  येणाऱ्या काही निवडणुकीत त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार असल्याच्या प्रतिक्रिया या निकालानंतर व्यक्त केल्या जात आहेत.

ढेबेवाडी विभागातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जात असलेल्या मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द या दोन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. विधान परिषदेचे आमदार नरेंद्र पाटील व जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील या दोघा बंधूद्वयांच्याविरूध्द हिंदूराव पाटील यांनी एक हाती सत्ता राखून हम भी कुछ कम नही हा धडा शिकविला असल्याच्या प्रतिक्रिया ढेबेवाडी विभागातून व्यक्त केल्या जात आहेत.

पाटण तालुक्यात ११  सार्वत्रिक ग्रामपंचायतींपैकी रामिष्टेवाडी कळकेवाडी व नवसरवाडी या तीन आ. देसाई गटाच्या ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत ८ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले होते. याची मतमोजणी सोमवार दि. २८  रोजी तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत सकाळी १०.३० वाजता घेण्यात आली. येराडवाडी, जमदाडवाडी, गव्हाणवाडी, मरळी, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, नारळवाडी व मल्हारपेठ अशा पध्दतीने मतमोजणी घेण्यात आली.

आ. शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्ल्यातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मल्हारपेठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-देसाईगट-राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या सुविद्य पत्नी सौ. धनश्री हर्षद कदम या विजयी झाल्या. तर ११ पैकी पाटणकर गटाने ७ व देसाई गटाने ४  जागांवर विजय संपादन केला. या ग्रामपंचायतीत सर्वाधिक जागा पाटणकर गटाला मिळाल्याने उपसरपंचपद हे पाटणकर गटाकडे आले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये हर्षद कदम यांच्या विरोधात देसाई गटाने उमेदवार उभा करून निवडून आणला होता. त्यामुळे येथे देसाई गट व शिवसेना असा संघर्ष निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षद कदम यांनी आपल्या सुविद्य पत्नीना ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत उभे करून देसाई गटाला आव्हान दिले होते. त्यात हर्षद कदम यांना यश मिळाल्याने शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांनी आ. नरेंद्र पाटील यांना पराभवाची धूळ चारत  आ. पाटील यांच्याकडे असणारी ग्रामपंचायत खेचून आणण्यात यश मिळविले. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अमोल महादेव पाटील हे विजय झाले तर राष्ट्रवादीचे हिंदूराव यशवंत पाटील यांना पराभव पत्कारावा लागला. येथे ११ पैकी कॉंग्रेसला ६ तर राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या. तसेच मंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये हिंदूराव पाटील यांनी आपली सत्ता अबाधित ठेवत सरपंचपदी सतीश आनंदराव कापसे हे विजयी झाले. येेथे ७ पैकी राष्ट्रीय कॉंग्रेसला ५ व राष्ट्रवादी कॉंग्रेसला २ जागा मिळाल्या.

नारळवाडी ग्रामपंचायत ही पूर्वी आ. शंभूराज देसाई यांच्याकडे होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तांतर घडवत ही ग्रामपचंायत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे खेचून आणण्यात यश मिळविले. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुमन मोहन चव्हाण यांची वर्णी लागली. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५ व देसाई गटाला २ जागा मिळाल्या.

आ. देसाई यांच्या गावातील मरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ९ जागांसाठी देसाई गटा अंतर्गतच दोन पॅनेल पडल्याने ही निवडणूक दोन गटातच झाली. यामध्ये देसाई गटाचे जे. ए. पाटील प्रणित स्व. शिवाजीराव देसाई परिवर्तन पॅनेलचे राजेंद्र नथुराम माळी हे सरपंचपदी निवडून आले. तर प्रविण पाटील प्रणित लोकनेते बाळासाहेब देसाई पॅनेलच्या सदस्यपदी कल्पना पाटील या एकमेव विजयी झाल्या. गव्हाणवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही देसाई गटांतर्गतच केवळ सरपंचपदासाठी निवडणूक झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४ सदस्य यापूर्वी बिनविरोध निवडून आले. तर सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये दीपक शंकर गव्हाण हे सरपंचपदी विजयी झाले. येथे २ सदस्यपदाच्या जागा रिक्त आहेत.

येराडवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपद व २ सदस्य पद रिक्त असल्याने येथे ५ जागांसाठी देसाई गटा अंतर्गतच लढत झाली. यामध्ये देसाई गटाचे पाचही सदस्य निवडून आले. जमदाडवाडी ग्रामपंचायतीत २ सदस्यपदाच्या जागा रिक्त असल्याने ५ जागांसाठी देसाई-पाटणकर अशी लढत झाली. यामध्ये देसाई गटाच्या विजया विठ्ठल कदम या सरपंचपदी निवडून येवून देसाई गटाची सत्ता अबाधित राहिली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रामहरी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय माने,  पी. एस. शिंदे, कृष्णत वाघमारे, सचिन थोरात, शेजवळ यांनी काम पाहिले. निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. मतमोजणीप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.