“मानिनी जत्रा 2017” शनिवार पासून सुरु ; 80 स्टॉलचा सहभाग ; एक हजार महिलांची बैठक व्यवस्था

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत मानिनी जत्रा 2017 दि. 23 ते 27 डिसेंबर 2017 या काळात सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित केले आहे. या जत्रेत 80 स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 22 स्टॉल फुड व इतर व्यवसायाचे 58 स्टॉल असणार आहेत. औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर, जालना येथून स्टॉलचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुढे बोलताना जि. प. अध्यक्ष संजीवराजे म्हणाले, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत मानिनी जत्रा व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. त्यामध्ये महिला बचतगटांनी उत्पादीत केलेल्या मालांची विक्री केली जाते. जिल्ह्यातून विविध व्यवसाय करणारे गट सहभागी होणार आहेत. दिव्यांग व्यक्तीस तीन स्टॉल आरक्षित राहणार आहेत. बचत गटाच्या स्टॉलमध्ये शाकाहारी जवण, वडा सांबर, नळगावचे मांडे, पुरण पोळी, थालीपीट, मांसाहार जवण त्यामध्ये मटण थाळी, चिकण थाळी, बिर्याणी, मच्छी, कोंडबी वडे, आदी स्टॉल बरोबरच मातीची भांडी, बंजारा ड्रेस, स्ट्रॉबेरी, जेली, टेडी, तांदूळ, सुट, बँग, प्लॅस्टिक बँग, जळगावचे पापड, लोणचे, शोभेच्या वस्तू, स्वेटर, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारच्या चटण्या, सेंद्रीय गुळ, काकवी आदी प्रकारचे गटांचे स्टॉल सहभागी होणार आहेत. मानिनी जत्रेमध्ये राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार स्वयंसहाय्यक गटांना तसेच बँकर्स व पत्रकारांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे. प्रदर्शनास भेट देण्यार्‍या व्यक्तींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहे.