माणमध्ये दुष्काळाशी आई-वडीलांचा लढा तर मुलांची मोबाईलवर गेमशी लढाई

म्हसवड (विजय भागवत)- माण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेल्यांमुळे जनावरांच्या चारा पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी आई-वडील संघर्ष करत आहेत. मात्र विद्यार्थी, युवक, आपल्या मोबाईलवर गेमशी खेळण्यात मग्न आहेत. दुष्काळी जरी असला तरी मोबाईल गेम खेळण्यात माण तालुक्यातील युवक मागे राहिले नाहीत. युवकांनी मोबाईल गेम खेळण्यापेक्षा स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रत्येक पालकांना वाटतं आहे.
अलीकडच्या काळात स्मार्ट फोनवरील इंटरनेटच्या माध्यमातून सारख्या नवनवीन गेम उपलब्ध होत असल्यामुळे लहान लहान मुलांपासून मोठे युवक देखील या गेमकडे आकर्षित होत आहेत. दिवस दिवस गेम खेळण्यात युवक वर्ग तसेच लहान लहान मुले मग्न होत असल्यामुळे लहान मुले अभ्यासापासून तर युवक वर्ग त्यांच्या कामापासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे नागरिकांना डोळ्यांच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.
सध्या सर्वत्र स्मार्ट फोन व इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वत्र दहिवडी बसस्थानक, म्हसवड बसस्थानक, दहिवडी काँलेज परिसरात,बसमध्ये प्रवासात, घरी या ठिकाणी बसलेल्या सर्व मुलांचे डोकेच दिवसभर मोबाईलमध्ये असते. मोबाईलमधील ऍपद्वारे अनेक गेम विनाशुल्क डाऊनलोड होतात. त्यामुळे अनेक युवक वेगवेगळी गेम डाऊऊनलोड करून वापरतात. मुळात मोबाईल वरील इंटरनेटच्या माध्यमातून शिकण्यासारखे खूप काही असतानाही युवक त्याकडे दुर्लक्ष करत असून नको त्या गोष्टीला जास्त महत्व देत आहेत. मोबाईलमध्ये यापूर्वी कँडी क्रश, पोकेमॉन, क्वाईन मास्टर तर आता पबजी या गेमने मुलांना वेड लावले आहे.
मोबाईलमध्ये व्यस्त झालेल्या मुलांना त्याचा जास्त मोह झाला असून अनेक युवक पाच पाच तास एका गेममध्ये मग्न झालेले असतात. सध्या पबजी गेमच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळे युवक एकत्र येऊन एकमेकांना माहिती देत इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी प्रत्यक्ष बोलून ऑनलाइन गेम खेळत असतात. त्यामुळे गेम खेळणार्‍या युवकांकडे पाहून शेजारी असलेले ज्येष्ठ नागरिकदेखील अचंबित होत आहेत. ही गेम खेळताना लहान मुले त्यांचा अभ्यास तर मोठी मुले देखील त्यांची सर्व कामे तसेच जेवण विसरून गेम खेळण्यात मग्न झालेले असतात. मुलांना मैदानी व शारीरिक खेळांची आवश्यकता असताना आज मुले सर्व मैदानी व शारीरिक खेळ विसरले असून कदाचित काही दिवसांनी युवकांना मैदानी खेळांचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे दिसून येऊ शकते. काही काळापूर्वी शाळा सुटल्यानंतर तसेच सुट्ट्यांच्या दिवशी युवक वर्ग वेगवेगळे मैदानी खेळ खेळताना दिसत होते; परंतु आता अलीकडील काळामध्ये युवक कोठेही मैदानी खेळ खेळताना दिसून येत नाहीत. तर सर्वत्र मुले मोबाईलच्या माध्यमातून खेळत असल्याचे दिसून येत आहे. काही युवकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये गेम खेळू शकत नसल्याने जुने मोबाईल बदली करून नवीन मोबाईल देखील विकत घेतले आहेत.