सातार्‍यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा समाजाचा विराट मोर्चा

छत्रपतींच्या राजधानीत मराठा समाज मुक मोर्चाने महाराष्ट्र हादरून सोडा
सातारा : मराठा समाजाने आत्तापर्यंत सर्व जाती-धर्माच्या समाजाला पोटात सामावून घेतल. मराठा समाजाला स्वत:साठी लढायची वेळ आली हे स्वप्नातही वाटत नाही. पण त्याच मराठा समाजाला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली. राजकारण नको, समाजासाठी एकत्र या. छत्रपतींच्या राजधातील मराठा मुक मोर्चाने पुरता महाराष्ट्र हादरून गेला पाहिजे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या मराठी बांधवानी केले. दरम्यान मराठी बंधू-भगिनीनो आता हिच वेळ आहे, आपल्या न्याय हक्कासाठी आणि होणार्‍या अन्यायाविरूध्द लढा देण्याची. सोमवार दि. 3 आक्टोंबर 2016 रोजी सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मुक मोर्चा काढला जाणार आहे. या मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहनही संयोजकांच्यावतीने करण्यात आले.
कोपर्डीत जे घडल, ते बघून मराठ्याची मान शरमेने खाली गेली आहे. त्या घटनेने मराठी बांधवांच्या कडा ओलावल्या आहेत. मराठी समाजावर सातत्याने होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, शिक्षण, नोकरीतील आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातील संयोजकांच्यावतीने सातारा येथील स्वराज मंगल कार्यालयात रविवार दिं. 11 रोजी विराट मुक मोर्चाचे आयोजन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा समाज हजारोच्या संखेनी एकवटला होता.
आ. नरेंद्र पाटील म्हणाले, मराठ्यांच्या आया, बहिणींची आब्रू लुटली जात आहे. किती दिवस आता हा अत्याचार सहन करायचा. शाळा, कॉलेज प्रवेश, नोकरीत आरक्षण नाही. त्यामुळे आपला समाज मागासलेला बनत चालला आहे. सातार्‍यातून काढण्यात येणार्‍या मुक मोर्चाला कुणाला पैशाची भिक मागू नका, स्वत:च्या खिशातले पैसे खर्च करून मराठी समाजाला न्याय हक्कासाठी मोर्चात सामिल करा. आपल्याला मोर्चा काढून राजकारण करायचे नाही तर समाजकारण करायचे आहे. सातार्‍यातून निघणार्‍या मराठ्यांच्या विराट मुक मोर्चाने पुरता महाराष्ट्र हादरून गेला पाहिजे असे आ. पाटील यांनी सांगितले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक शिवाजी पासलकर म्हणाले, आत्तापर्यंत परभणी, बीड, औरंगाबाद येथे मराठा समाजाचा मोर्चा काढण्यापुर्वी ज्या बैठका झाल्या. त्यापेक्षाही सातार्‍यातील बैठकीला हजारोंची उपस्थिती लक्षणीय होती. मराठ्यांनो आता घाबरू नका. आपला समाज जागा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी गमिनी काव्याने लढाई करून सर्व समाजाला न्याय दिला. त्या लढाईत मराठे मोठ्या संखेनी सहभागी होते. त्याच गमिनी काव्याने मराठी समाजाच्या हक्कासाठी आणि होणार्‍या अन्यायाविरोधात लढण्यासाठी लढायची वेळ आली आहे. छत्रपतींच्या गादीचे वासरदार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे मराठ्यांच्या पोरांनो आता मागे हटू नका. मराठा समाज आता पेटून उठला आहे. मराठा पेटला की, काय होते ते सातार्‍यातून निघणार्‍या मुक मोर्चातून दाखवून द्या असे आवाहन पासलकर यांनी केले.
प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, जेंव्हा-जेव्हा मराठा समाज एकवटला आहे, त्या-त्यावेळी इतिहास घडला आहे. मराठ्यांमुळे दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला, ब्रिटीशांना मराठ्यांनी सळो की, पळो करून सोडल होत हा इतिहास विसरू नका. मराठा समाजाने आत्तापर्यंत सर्व जाती-धर्माच्या लोकांना पोटात सामावून घेतल. त्याच मराठा समाजाला आता अन्याय सहन करण्याची वेळ आली आहे. आपल्याला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर येण्याची वेळ हे मराठा समाजाने स्वप्नातही पाहिले नसेल, पण ती वेळ आज परिस्थितीने आणून दिली आहे. असे सांगून बानुगडे म्हणाले, यापुढे मराठा समाज अन्याय सहन करणार नाही, जर कुणावर अन्याय होत असेल तर तो होवू देणार नाही. आज मराठी समाजातील माता-भगीनींवर अत्याचार होत आहेत. या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी बनून लढा दिला पाहिजे. सर्व समाजाला आरक्षण मिळाले, मराठ्यांना नाही. म्हणून आज मराठ्याच्या पोराला 90 टक्के मार्क मिळाले तरी त्याला शैक्षणीक प्रवेश मिळत नाही. नोकरी मिळत नाही. रस्त्याने फिरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. एकत्र येण्याची ही शेवटची संधी आहे. म्हणून सातार्‍यात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने 3 आक्टोंबर रोजी मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पुर्वीच्या काळी महाराजांच्या राजवाड्यावर एखादे कार्य असले की, गावच्या चुली बंद असायच्या तशाच पध्दतीने मुक मोर्चासाठी गावे बंद करू मराठी समाजातील माता, बंधू, भगिनींनी, युवकांनी छत्रपतींच्या गादीला साजेशी लाखोंची गर्दी करून सहभागी व्हावे. मराठा असाल तर हक्कासाठी आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी रस्त्यावर याल असे आवाहन करून सातार्‍यातील मुक मोर्चाचा महाराष्ट्रात इतिहास घडवा असेही बानुगडे यांनी स्पष्ट केले.
गितांजली कदम म्हणाल्या, कोपर्डी घटना ही महिलांवरील अत्याचाराची घटना आहे. अशा घटना भविष्यात घडू नये. आजच्या बैठकीला महिलांची हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही उपस्थिती नाही. निघणार्‍या मुक मोर्चाला घराघरातून महिला रस्त्यावर आल्या पाहीजेत. आज कॉलेज परिसरात युवतींची छेडछाड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. म्हणून महिलांनी निर्भिडपणे रस्त्यावर उतरून मराठी महिलांची दहशत दाखवून द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
नगरसेवक जयेंद्र चव्हाण म्हणाले, सातार्‍यातून निघणार्‍या मराठी समाजाच्या मुक मोर्चाच्या बैठकीला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले येणार होते मात्र त्यांना कामानिमित्त बाहेर जावे लागल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यावतीने मोर्चाची जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही जबाबदारीत कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. जिल्हा बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई म्हणाले, खटाव-माण तालुक्यातून मोठ्या संखेनी मराठी बांधव, भगिनी सहभागी होतील. मुक मोर्चा असा काढा की, मराठा समाजाच्या मोर्चाने आता धडकीच भरली पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, प्रशांत पवार यांनीही मुक मोर्चा संदर्भात सुचना केल्या.
मराठी बांधवानी चार प्रमुख मार्गांनी एकत्रित यावे

 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. शहराची रस्त्यांची भौगोलीक परिस्थितीचा विचार करता मोर्चा लाखोच्या संखेली गर्दी होणार आहे. मोर्चा शांततेत व नियोजीत काढण्यासाठी जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील मराठा बांधव व भगिनींनी सातारा शहरात येणार्‍या चार प्रमुख रस्त्यांनी पोवई नाक्यावरील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमायचे आहे. मुक मोर्चात कोणतीही घोषणाबाजी होणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. तरी जिल्ह्यातील मराठी बांधवानी लाखोच्या संखेनी मुक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.