मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या ; राष्ट्रवादीचे तेजस शिंदे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले होते. आरक्षणासाठीच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील देखील विविध भागात आंदोलन करण्यात आली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलनामध्ये सर्वच स्तरातील युवक व समाजबांधव सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य मागण्यासाठी मराठा समाजाकडून राज्यभर मोर्चे काढण्यात आले होते. यात काही ठिकाणी आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी आग्रहाची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. यावेळी गोरखनाथ नलावडे, अतुल शिंदे, शुभम साळुंखे, सनी शिर्के, समीर राजेघाटगे व पदाधिकारी उपस्थित होते.