मराठा क्रांती मोर्चातील युवकांनी मायणी ते वडूज तहसीलदार कार्यालय हे 27 किमी चे अंतर पायी चालत जाऊन दिले तहसीलदारांना निवेदन ; मायणीसह भागात कडकडीत बंद,मोर्चा व ठिय्या आंदोलन

मायणी – सतीश डोंगरे –   मायणी सह भागात सर्वत्र संपूर्ण बाजारपेठ बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला असून सकल मराठा समाज बांधवांनी आज सकाळी दहाच्या दरम्यान मायणी गावातून घोषणाबाजी करत भव्य फेरी काढली तर चांदणी चौकातून मराठा ठोक मोर्चात युवकांनी स्वतः सरकारचा निषेध करीत मायणी हुन 27 किमी अंतरावरील तालुक्याच्या ठिकाणी वडूज येथे जाऊन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यासाठी पायी जाण्याचा निर्णय घेतला व वडूज येथे पायी पदयात्रा यशस्वी करीत तहसीलदार यांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले .

तत्पूर्वी सकाळी मायणी येथील सकल मराठा बांधव चांदणी चौक येथे एकत्र आले व त्यानंतर शिवरायांना वंदन करून संपूर्ण गावातून घोषणा देत मोर्चा काढण्यात आला . चांदणी चौक येथे मोर्चा आल्यानंतर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले व त्यानंतर मराठा क्रांती मोर्चातील युवकांनी पायी तालुक्याच्या गावी जाऊन तहसीलदाराना देण्याचा निर्णय घेतला. मराठा क्रांती मोर्चातील वीस युवकांचे शिष्टमंडळ हातात भगवा घेऊन मायणीतुन पायी निघून सुर्याचीवाडी,कातरखटाव ,वडूज असे मार्गक्रमण करीत वडूज येथील तहसील कार्यालय येथे पोहचले.याठिकाणी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.

यापूर्वी मायणी दुरक्षेत्राचे सपोनि संतोष गोसावी यांनी मराठा मोर्चा बैठकी दरम्यान शांततेचे आवाहन केले होते.तसेच मराठा क्रांती मोर्चा संयोजकांनी आपल्या मागण्या लोकशाही पद्धतीने गावातून मोर्चा काढून चांदणी चौक येथे ठिय्या आंदोलन करून आपल्या मागण्या मांडल्या. सपोनि संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवला नाही.

–  मायणी येथील मराठा क्रांती मोर्चातील युवकांनी पदयात्रा काढत वडूज येथे पायी जाऊन निवेदन देण्याचा निश्चय केल्यानंतर युवकांच्या संयमी आंदोलनाचा आदर करीत सपोनि संतोष गोसावी यांनीही या युवकांच्यासोबत पायी चालून या युवकांना प्रोत्साहन केले. सपोनि गोसावी यांच्या याकृती मुळे आंदोलक युवकांच्यात पोलिसांप्रती मैत्रीभाव वाढला.