१५ ऑगस्ट ला सगळीकडे होणार जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते ध्वजारोहण ; पाटण येथील ठिय्या आंदोलनात निर्णय

आंदोलन ठिकाणी आंदोलकांना जेवण देण्यात आले.
सरकारला देण्यात येणाऱ्या निवेदनासाठी सह्यांची मोहिम राबविताना विध्यार्थींनी.

पाटण:- राज्यात सगळीकडे मराठा आंदोलनांची धग वाढत जात असताना. बुधवारी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या १५ ऑगस्ट ला सगळीकडे सर्व समाजातील जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मराठा समाज हा सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारा समाज आहे. यासाठी सर्व मराठा बांधवांनी सर्व शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालय, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, सहकारी संस्था येथे जिजाऊंच्या लेंकीच्या हस्ते ध्वजारोहण होण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी. मग ती जिजाऊंची लेक कोणत्याही समाजाची असेल तरी चालेल. असा निर्णय पाटण येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी घेण्यात आला. मराठा आंदोलनात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवांनी यावेळी सांगितले. रविवारी केर, तामकणे, मणदुरे, केरळ विभागासह महिलांचा होणार ठिय्या.

पाटण येथे ९ औगस्ट पासून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चा ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तालुक्यातील पाटण- रामापूर, काळोली, मुळगाव, येरफळे, म्हावशी या विभागातील मराठा बांधवांनी तसेच महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी – विध्यार्थींनी तहसील कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन मराठा बांधवांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भारत स्वातंत्र्य लढ्यात मराठा मावळ्यांचा मोठा सहभाग आहे. मराठा क्रांतीकारकांच्या लढ्यामुळेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज तोच लढवय्या मराठा समाज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागासलेला झाला आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी बुधवार दि. १५ औगस्ट रोजी मंत्रालय पासून ते ग्रामपंचायत, पर्यंत तसेच सर्व शाळा – महाविद्यालय, सहकारी संस्था या ठिकाणी सगळीकडे होणारे ध्वजारोहण हे जिजाऊंच्या लेंकीच्या हस्ते घेण्यात यावे. मग ती जिजाऊंची लेक कोणत्याही समाजाची असेल तरी चालेल. यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या बांधवांनी सगळीकडे आग्रही भूमिका घ्यावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी हि शासनाला मराठा समाजाच्या मागण्यासोंबत पाच हजार सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी सह्यांची मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांचा व नागरीकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.