मायक्रो फायनान्सकडील महिलांच्या कर्जमाफीसाठी रान उठवणार : संदीपदादा मोझर ; मनसेच्या कार्यालयात जिल्ह्यातील महिलांची बैठक

सातारा : वाट्टेल ते झाले तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत मायक्रोफायनान्स कंपन्यांकडील कर्जातून सर्व ठिकाणच्या माता- भगिनींना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देणारच, त्यासाठी अभ्यासू वकीलांची मोठी फौज उभी करण्यास मागेपुढे पाहणार नाही, मायक्रोफायनान्सच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण राज्यभर रान उठवणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातारा (पिरवाडी) येथील कार्यालयात नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील महिलांच्या उत्स्फूर्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी खेडच्या उपसरपंच सौ. सुशिलाताई मोझर, मनसे महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा मनिषाताई चव्हाण, सुनंदाताई देसाई, कराड तालुकाध्यक्ष भारतीताई गावडे, स्वाती माने, सातारा तालुकाध्यक्षा अनिताताई जाधव, आदी पदाधिकार्‍यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत ठिकठिकाणहून आलेल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे आपली मते मांडली. तसेच मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणार्‍या छळवणुकीबाबत आपले अनुभव विषद केले. संबंधित कंपन्यांच्या वसुली अधिकार्‍यांकडून होणार्‍या धाकधपटशा व दहशतीमुळे आपले आणि कुटुंबियांचे जीवन हैराण झाल्याचेही सांगितले. अनेक महिलांनी मायक्रो फायनान्सच्या छळवादामुळे आता आत्महत्त्येशिवाय पर्याय नाही, असे या बैठकीत सांगितल्यावर संदीपदादा मोझर यांनी जोपर्यंत आपल्या पाठीशी हा भाऊ ठामपणे उभा आहे तोपर्यंत आजिबात घाबरु नका. जीवात जीव असेपर्यंत मी तुमची पाठराखण करेन आणि तुमच्या घरातील चमच्यालासुद्धा हात लावण्याचे धाडस वसुली अधिकार्‍यांना करु देणार नाहीफ असा विश्‍वास दिला. तसेच आता रडायचे नाही तर लढायचे असा निर्धार व्यक्त करुन संपूर्ण कर्जमाफी घेतल्याशिवाय लढा थांबवायचा नाही, असा शब्दही महिलांना दिला.
या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतील, त्यासाठी बर्‍या वाईट परिणामांची तमा न बाळगता माझ्या माता भगिणींसाठी मी व माझे मावळे तुरुंगात जायलाही तयार आहोत. जर आम्हावरील अन्याय वेळीच दूर न झाल्यास लवकरच मंत्रालयावर याबाबत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले. आजवरच्या आपल्या आंदोलनाचा धसका घेऊन मायक्रोफायनान्स कंपन्या गुडघ्यावर आल्या आहेत. प्रशासनाला संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करण्यास भाग पाडण्याची धमक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेे आहे. माझ्याविषयी अपप्रचार करण्याची कुटील नीती मायक्रोफायनान्स कंपन्या व काही राजकीय मंडळींकडून होत आहे. मात्र, त्याची तमा न बाळगता माझ्या माता-भगिणींची कर्जे माफ करण्यासाठी जीवाचे रान करुन हा प्रश्‍न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असेही संदीपदादांनी यावेळी सांगितले.
खटल्याचे मुद्रांक शुल्क संदीपदादा भरणार
मुळातच कष्टकरी कर्जदार महिलांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकीची असून दोनवेळचे जेवण मिळणे त्यांना अवघड असताना न्यायालयात हजर राहणे व प्रवासासाठी पैसे खर्च करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत मायक्रोफायनान्स कंपन्यांची मुख्यालये असलेल्या मुंबई, चेन्नई, कोलकाता आदी ठिकाणहून महिलांना नोटीसा येत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेस आमच्या माता-भगिनी घाबरत नसून त्या लढा देण्यास सक्षम आहेतच. त्यांच्या बाजूने वकिलांची फौजच्या फौज उभी करण्यास संदीप मोझर सक्षम आहे. या खटल्यासाठीचा मुद्रांक शुल्क व तांत्रिक खर्च आपण स्वत: करणार असून सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व अभ्यासू वकिलांनी हे खटले विनाशुल्क लढावेत म्हणून जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांना आपण निवेदने देत असल्याचेही संदीपदादांनी यावेळी सांगितले.