वाढत्या जंगलतोडीमुळे वन्यप्राणी होऊ लागली दुर्मीळ

परळी (अल्पेश लोटेकर) : वाढत्या जंगलतोडीळे तसेच चोरट्या शिकारीमुळे पृथ्वीतलावरील अनेक प्राणी-पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील काही तर आता केवळ प्राणी संग्रहालयात पहावयास मिळतात पर्यावरणाच्या रक्षणासाठी पशू-पक्ष्यांचे संरक्षण गरजेचे आहे. अलिकडे नव्या पिढीला प्राण्यांची ओळख टिव्ही, मोबाईल आणि चित्रांच्या माध्यमातून दाखविण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पशू-पक्ष्यांचे संरक्षण गरजेचे असल्याची भावना प्राणीमित्रातून व्यक्त होऊ लागली आहे.
वाढते शहरीकरण व औद्योगिकरण यामुळे रस्ते व नागरीकरणाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या सर्व गोष्टीमुळे भरमसाठरित्या वृक्षतोड होत आहे. त्यामुळेच जंगलभागातील गावापासून सहजरित्या दिसणारे हरिण,मोर, काळवीट, ससा, पोपट व चिमण्यांचे थवे, आकाशात भरारी घेणार्या पक्ष्यांची किलबिल हे सर्व आता हरवत चालल्याची खंत जेष्ठ नागरिक करत आहेत.
या प्राणांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने हे प्राणी पाहणे म्हणजे दुर्मिळ क्षण बनला आहे. या प्राण्यांबरोबरच भरमसाट जंगलतोड होत असल्याने जंगली प्राण्यांचे प्रमाणही घटत आहे ही शोकांतिका आहे.
शहरीकरणामुळे नोकरी व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने आज जवळजवळ सत्तर टक्के लोक नागरी वस्तीत वास्तव्य झाले आहेत. काही वर्षांपासून नागरी वस्तीत जन्म घेतलेल्या नव्या पिढीला जंगली रानटी व पाळीव प्राण्यांना ओळखण्यासाठी प्राणांची पुतळे खेळणी किंवा छायाचित्राचा आधार घ्यावा लागत आहे . यासाठी पुस्तकांबरोबरच शालेय वस्तू विक्री दुकानातून प्राण्यांची वेगवेगळी चार्टही विक्रीस ठेवले गेले आहेत अनेक शाळांमधून प्रोजेक्टसाठी अशा चित्रांचा सर्रास उपयोग केला जात आहे. काही व्यावसायिकांनी प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बनवून शोपीस म्हणून विक्रीस ठेवले आहेत त्यांच्या किमतीही भरमसाठ आहेत. परिसरात लाकूड व इतर साहित्यापासून हरिण, वाघ, सिंह, घोरपड, काळवीट यासारख्या लहान मोठ्या प्राण्यांच्या प्रतिकृतीचा बाजार होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
पाळीव प्राण्यांची संख्याही घटली
औद्योगीकरण व जनावरे संगोपन वरील वाढता खर्च विचारात घेता शेतकरी जनावरे पाळत नाहीत. बैलांच्या साह्याने होणारी मशागतीची कामे आता ट्रॅक्टर व नवनवीन यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यामुळे गावोगावी पाळू प्राण्यांची संख्याही घटली आहे. परिणामी गाय बैलांची दिवाळी म्हणून साजर्‍या होणार्‍या बेंदूर सणाची प्रथा मातीच्या बैलाद्वारे केली जात असल्याचे चित्र आह पहावयास मिळत आहे.
मानवाच्या अर्निबध वागण्यानेच वन्यजीव शहराकडे
अलीकडे बिबट्यासारखे वन्यजीव सातारा शहरात येण्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यांच्या या आगमनास मानवाचे अर्निबध वागणे कारणीभूत आहे. मानवाने मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली आहे. वाढत्या जंगलतोडीमुळेच वन्यप्राण्यांची आश्रयस्थानेच नाहीशी झाली आहेत. जंगलात त्यांना मिळणारे खाद्यही त्यामुळे मिळेनासे झाले आहेत. वन्यप्राण्यांना संरक्षण देण्याची तसेच पर्यावरणरक्षणाची गरज आहे. भावी पिढीपर्यंत निसर्गाचा हा अमूल्य ठेवा कायम ठेवावयाचा असल्यास पर्यावरण संरक्षण काळाची गरज झाली आहे.