खराब बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा : पालकमंत्री विजय शिवतारे

सातारा :  शेतकर्‍यांना पेरणीसाठी देण्यात येणार्‍या बी-बियाणांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा. यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकाने तक्रारीची वाट न पाहता  छापे टाकावेत. निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते तसेच किटक नाशक विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतरे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात आयोजित खरीप हंगाम 2017 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. शिवतारे बोलत होते.  या बैठकीस सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर खा. विजयसिंह मोहिते पाटील, सर्वश्री आमदार मोहनराव कदम, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी चांगदेव बागल आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले, शेतकरी ज्या कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करतात त्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रात तक्रार रजिस्टर ठेवण्याचे बंधनकारक करा.  शेतकर्‍यांसाठी बियाणांबाबत तक्रार करण्यासाठी एक संपर्क क्रमांक बियाणे विक्रेत्याने प्रदर्शित करावा.  कृषी विभागाने येणार्‍या तक्रारींचा आढावा घेऊन या तक्रारी गुण नियंत्रण कक्षाकडे पाठवाव्यात म्हणजेच बोगस बियाणांवर आळा बसेल. कृषी पंपांच्या जोडणीबाबत वित्तमंत्र्यांच्याबरोबर येत्या काही दिवसात सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक घेऊन हाही प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी श्री. मुद्गल म्हणाले, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी हे अभियान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शेतकर्‍यांनी बियाणे व खते  कोणती घेतली पाहिजे याची माहिती देवून  पीक प्रात्यक्षिकेही दिली जाणार आहेत, त्याचा भविष्यात शेतकर्‍यांना फायदा होईल. शेतकर्‍यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या   ज्या योजना आहेत  त्या योजना या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. जिल्ह्याचे 8 लाख हेक्टर क्षेत्र लागवडी युक्त आहे. यामध्ये 63 टक्के खरीप व 36 टक्के रब्बीचे आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र वाढत आहे. मागणीनुसार खतांचा व बियाणांचा पुरवठा जिल्ह्याला होणार आहे. खतांच्या व बियाणांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कुणी दोषी आढळल्यास या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. कृषी विभागामार्फत 8 लाख शेकर्‍यांच्या शेतीचे माती परीक्षण करण्यात आले असून या परीक्षणासाठी 10 प्रयोग शाळा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील 9 तालुके ही खरीपाची आहे. खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते कमी पडणार नाहीत याचे नियोजन करण्यात आले आहे. मुग, उडीद, सोयाबीन पिकांसाठी स्वत:कडील बीयाणे वापरण्याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या खर्चातही बचत होणार आहे. खरीप हंगाम 2017 साठी 1 लाख 28 हजार  मे. टन खताची  तर 53 हजार 867 किलो बियाणांची मागणी केली असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे सन 2017 खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेच्या विशेष समित्यांचे सभापती, पंचायत समितींचे सभापती, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.