येळगांवकरांच्या षडयंत्राला भीक घालत नाही : सुरेंद्र गुदगे

सातारा : मोहन जाधव यांनी केलेल्या तथाकथित आत्महत्येचे भांडवल करुन डॉ. दिलीप येळगांवकर हे आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. या खोट्या गुन्ह्यामध्ये मला अडकविण्याचा केविलवाणा प्रयत्न डॉ. येळगांवकर करत आहेत.
डॉ. येळगांवकर यांच्या या पोरकटपणाला आणि नाटकी देखाव्याला मी भीक घालणार नाही असे प्रतिपादन जि. प. सदस्य आणि मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
मोहन जाधव यांनी मायणी अर्बन बँकेचे कर्ज सुमारे 7 ते 8 वर्षापूर्वी काढले होते. कर्ज थकीत झाल्यानंतर बँकेने मोहन जाधव यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई केली होती. मयत मोहन जाधव यांनी बँकेला कर्जापोटी जो चेक दिलेला होता तो चेक देखील वटलेला नव्हता. त्यामुळे त्यांचेविरुध्द बँकेने न्यायालयात दाखल केलेला फौजदारी खटला अद्यापी न्यायालयात प्रलंबित आहे. डॉ. येळगांवकर यांना कायद्याच्या प्रक्रियेची काडीचीही जाण नसल्याने अज्ञानापोटी ते मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करुन पोलिसांची दिशाभूल करत आहेत. 7 ते 8 वर्षापूर्वीच्या कर्जाची 3 वर्षापूर्वी पूर्णफेड केल्यानंतर त्याचा 3 वर्षानंतर मानसिक त्रास झाला असे म्हणणे हास्यापद आहे. पोलिसांनी कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता सत्य शोधून काढावे. या कारस्थानामागे डॉ. येळगांवकर तर आहेतच. परंतु या संगनमतांमध्ये अजून कोण कोण सामील आहेत हे देखील पोलिसांनी शोधून काढले पाहिजे.
माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी व मला त्रास देण्यासाठी राजकीय व्देषापोटी या तथाकथित गुन्ह्यामध्ये मला गोवण्यात आलेले असल्याने सत्य शोधून काढण्यासाठी या गुन्ह्याचा तपास सी. आय. डी. कडे सोपविण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.