घंटागाडी चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

सातारा : सातार्‍यात बेमुदत संपावर असणार्‍या 40 घंटागाडी चालकांनी सोमवारी सातार्‍यात घंटानाद मोर्चा काढला. दरम्यान बैठकीत शहराचा स्वच्छता प्रश्न असंवेदनशीलपणे हाताळल्याबद्दल जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना खडे बोल सुनावाले.
घंटागाडी वाल्यांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा असा थेट आदेश त्यांनी दिल्याने .पालिका प्रशासनाला दुपारी चार वाजता तत्काळ बैठक बोलवावी लागली. साशा विरूध्द घंटागाडी चालक असा वाद पेटला असून सातारा शहरात घंटा गाडी सेवा  बेमुदत संपावर आहे. या संपाचा भाग म्हणून घंटागाडी चालकांनी पूर्वपरवानगीने सातार्‍यात राजवाडा ते नगरपालिका व तेथून जिल्हाधिकारी कार्यालय असा घंटानाद मोर्चा काढला. या मोर्चात सर्व घंटागाडया सहभागी झाल्या होत्या. सकाळी अकरा वाजता पालिकेच्या प्रवेशद्वारावर जोरजोरात घंटानाद करण्यात आला तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. साशा कंपनीच्या विना करार सेवेचा आम्ही निषेध करत असून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा संप सुरूच राहणार असल्याचा इशारा घंटागाडी चालक संघटनेने दिला आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर घंटागाडी चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली.
 जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लोकशाही दिनानंतर एका बैठकीत मुख्याधिकारी शंकर गोरे यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे वृत्त आहे. घंटागाडी चालकांचा प्रश्न असंवेदनशीलपणे हाताळल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक त करत त्यांना तत्काळ प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने पालिका प्रशासनाला पुन्हा बैठक घेउन मध्यस्थी करण्याची वेळ आली.