भारिप बहुजन महासंघाचे सातार्‍यात आक्रोश आंदोलन

साताराः खैरलांजी, उन्हा, खर्डा ते सातारा जिल्हयातील चिंचनेर वंदन येथील व देशातील आणि राज्यातील दलित अत्याचार पिडीतांना न्याय कधी मिळणार या मागणीसाठी आज भारिप बहुजन महासंघ सातारा जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने व प्रशासनाने जनतेच्या सुरक्षेची हमी घ्यावी, जातीय सलोखा वाढविण्यासाठी गाव, वाडीवस्त्या याठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घ्यावेत. ज्या गावामध्ये जातीय हल्ले, अन्याय, अत्याचार होतील त्या गावांना शासकीय निधी नाकारण्यात यावा, राजकीय इच्छाशक्ती आणि गुन्हयातील तपास यंत्रणेची मानसिकता सुधारण्याची अवस्था तसेच तपास यंत्रणा सदोष करून त्यावेळचा राजकीय हस्तक्षेप थांबवून कसूर करणार्‍यास जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. दलित अन्याय, अत्याचार प्रकरणातील साक्षीदार यांना सुरक्षा पुरवून जे फितूर होतील त्यांना सहआरोपी करण्यात यावे. नितीन आगे खूनप्रकरणी तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत. चिंचणेर वंदन वस्ती हल्लाप्रकरणी झालेली समाजमंदिराची तोडफोड तसेच जिमचे नुकसान याबाबत भरपाई मिळावी. गावाला बस थांबा, पिठाची गिरणी, किराणा दुकान, मंडई यासंदर्भात स्पष्ट आदेश अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्ष न्या. थूल साहेब यांनी आदेश दिले आहेत. यासंदर्भात अंमलबजावणी करावी. नागठाणे येथील शंकर मोहिते खूनप्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीना कडक शासन व्हावे जिल्हयात 112 दलित अत्याचारातील प्रकरणावर न्यायनिवाडा करावा अशी मागणी करण्यात आली.
या आक्रोश आंदोलनात यावेळी चंद्रकांत खंडाईत, मिनाज सय्यद, गणेश भिसे, शाहीर शीतल साठे व सचिन माळी, सुनील त्रिंबके, अस्लम तडसरकर, सिद्धार्थ खरात, कल्पना कांबळे, विशाल भोसले, सुजाता काकडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.