मुरुडला दुर्मीळ काटेरी केंड मासा सापडला

अलिबाग -मुरुड येथील समुद्रकिनार्‍यावर मंगळवारी सकाळी अत्यंत दुर्मीळ समजला जाणारा काटेरी केंड नावाचा मासा आढळून आला. घुबडासारखे तोंड असणारा आणि अंगावर काटे असणारा हा मासा वादळापूर्वी किनार्‍याजवळ येत असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात.
रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बले हे मंगळवारी समुद्रकिनारी सकाळच्या प्रहरी फेरफटका मारावयास गेले असताना त्यांना कोटेश्वरी मंदिराच्या खालच्या बाजूस किनार्‍याला मृत काटेरी केंड मासा आढळून आला.
41 सेंटिमीटर लांब तर 24 सेंटिमीटर रुंद असा हा मासा असून त्याच्या पाठीवर सर्व काटे आढळून आले आहे. इंग्रजीत या माशाला फर फिश म्हणून संबोधले जाते. हा मासा खोल समुद्रात समूहाने राहतो. याचे दात एवढे कठीण असतात की जाळी अगदी सहज तोडून हा पलायन करतो. हा मासा जाळीत अडकलेली सर्व मासळी खाऊन सांगाडे शिल्लक ठेवत असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली.
23 जुलै 1989 रोजी समुद्रात अचानक तुफान व वादळ झाले होते. या वेळी मोठया लाटांच्या प्रवाहात अनेक बोटी बुडाल्या होत्या. यात काही मच्छीमार मुत्युमुखी पडले होते. त्या वेळीसुद्धा समुद्रकिनारी अशाच प्रकारचे मासे आढळून आले होते. त्यामुळे समुद्र खवळल्याने हा मासा किनार्‍यावर आला असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.