न्यायासाठी नाभिक समाजाची मुंबईत राज्यव्यापी बैठक

पुसेसावळी(प्रतिनिधी) : नाभिक समाजाच्या आरक्षणासहित प्रलंबित मागण्यांसाठी तसेच समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलनाची भुमिका निश्चित करण्याकरीता राष्ट्रीय नाभिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ
संघटनेच्या पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक दि.20/08/2018 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर. बांद्रा (पश्चिम) मंबुई येथे दुपारी 12 वाजता
राष्ट्रीय अध्यक्ष मा.भगवानराव बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे,प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील,महासचिव प्रभाकर फुलबांदे,जेष्ठ नेते शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नाभिक महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य,विभागीय, जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्षांची तातडीची बैठक बोलविण्यात आलेली आहे.
गेल्या 25 ते 30 वर्षापासून नाभिक समाज आपल्या न्याय हक्कासाठी सातत्याने मेळावे,परिषदा,सभा,अधिवेशने तसेच उपोषण,धरणे आंदोलन व मोर्चाच्या माध्यमातून संघर्ष करीत राज्यकर्त्याकडे नाभिक समाजाचे प्रश्न मांडत आलेला आहे परंतु राज्यकर्ते व शासनकर्त्यानी नाभिक समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे.गतकाळात 2006 चे भव्य रौप्यमहोत्सवी अधिवेशन तसेच 30 मे 2011 च्या आझाद मैदानावरील लाखो बांधवांच्या
धडक महामोर्चामुळे राज्यकर्त्यांनी समाज प्रश्नांची दखल घेवून मंत्रालयात समाजाच्या शिष्टमंडळाच्या समवेत संबंधित खात्याचे मंत्री व सचिवांच्या बैठका झाल्या त्यानुसार काही विषयांवर कामकाजास आरंभही करण्यात आला परंतु राज्यकर्त्यांचा सत्तेतील कालावधी संपताच सामाजिक प्रश्नांना खिळ बसली त्यामुळे समाजाच्या पदरात काहीही पडले नाही.
नाभिक समाजाच्या आरक्षणासहित इतर मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत याकरिता समाजाच्या मागण्यांची पुर्तता करुन घेण्यासाठी संघर्षाची भुमिका घेऊन राज्यस्तरावर आंदोलन उभारण्याकरिता सोमवार 20 ऑगस्ट रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या महत्वपूर्ण बैठकीस राष्ट्रीय नाभिक महासंघ,महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत नाभिक कर्मचारी महासंघ,नाभिक युवा सेना,नाभिक युवक महासंघ. नाभिक विद्यार्थी महासंघ,सलुन असोसिएशन व नाभिक महिला महासंघ यासह सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांनी केले आहे.