मोठ्या उत्साहात व भक्तिभावात श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील देवतांचा वार्षिक रथोत्सव संपन्न ; मंगळवारी कल्याणोत्सवाने उत्सवाची सांगता

साताराः कांची कामकोटी पीठाचे महास्वामी प.पू. शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती  तसेच प.पू. जयेंद्र सरस्वती व त्यांचे परमशिष्प प.पू. शंकरविजयेंद्र सरस्वती  यांच्या शुभाशिवार्दाने सातारा येथे साकारण्यात आलेल्या प्रसिध्द अशा श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील देवदेवतांचा वार्षिक भव्य दिव्य रथोत्सव सातारा शहरात अमाप उत्साहात व भक्तिभावात आज सोमवारी  संपन्न झाला.
वेदमूर्ती दत्ता शास्त्री  जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी देवता पूजन करुन शंख ध्वनीच्या मंगलमय वातावरणात या देवांच्या मूर्ती वेदमंत्रांच्या जयघेाषात रथाकडे आणण्यात आल्या.कर्नाटक-कुमठा येथून आणलेल्या अजंठा शैलीतील काष्ठ रथात मंदिरातील सर्व देवदेवतांच्या मूर्तींना फुलांच्या सजावटीत विराजमान केल्यावर रथाचे पूजन सातारा येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त ईश्‍वर सुर्यवंशी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रज्ञा सुर्यवंशी, मुथा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख संचालक  अजितशेठ मुथा,लेख़ा परिक्षक सतीश चौरासिया व  त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंजु चौरासिया या सर्व मान्यवरांचे  शुभहस्ते तसेच रमेश शानभाग, सौ.उषा शानभाग,अ‍ॅड.दत्तात्रय बनकर,सुधाकर शानभाग आदी मान्यरांचे उपस्थितीत करण्यात आले.यावेळी मंदिराचे विश्‍वस्त  नारायण राव,मुकुंद मोघे,रणजीत सावंत, पद्मनाभ आचार्य, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,ज्योतिषाचार्य के. शास्त्री, वासुदेवराव नायर,तसेच ब्रह्मवृंद आनंद शेठ कासट, पत्रकार अतुल देशपांडे, प्रदीप कुलकर्णी, महेश स्वामी,राजेंद्र शानभाग,सौ आंचल घोरपडे,सौ शहाणे, अय्यपा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यंकर्ते व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रथयात्रेच्या शुभारंभ प्रसंगी हातात कलश घेतलेल्या पन्नास सुवासिनींनी  रथयात्रेचे  स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रथाच्या पूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.अग्रभागी सनई  जाधव चौघडा पार्टीचे मंगल सनई वादन सुरु होते.त्यामागे फुलानी सजवलेल्या छोट्या रथात शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. मंदीराभोवती या रथाची प्रदक्षिणा होवून रथ शहराकडे मार्गस्थ झाला.रथयात्रेत शहनाई पार्टी,कृष्णानगर येथील पवन हनुमान भजनी मंडळ,प्रतापसिंहनगर येथील तुळजा भवानी भजनी मंडळ गायन व वादनाने सहभागी झाली होती.रथयात्रेचे सातारा शहरात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले व अनेक मान्यवरांनी या रथाचे दर्शन घेतले.रथयात्रेच्या मार्गावर भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात व फटाक्यांच्या आतषबाजीत रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. भजनी मंडळे,वाद्य वृदांच्या गजरात सातारा शहरातील वातावरण  यामुळे भक्तीमय झाले होते.
संपूर्ण रथमार्गावर महिलांनी देव देवतांचे पंचारतीनी औक्षण केले व पूजन केले.राजवाडा येथे रथाचे दर्शनासाठी भावीकांनी मोठी गर्दी केली होती. नटराज मंदिर येथून निघालेली रथयात्रा शहरातील गोडोली, शाहू चौक, मोती चौक, राजवाडा, खालचा रस्ता, पोलीस मुख्यालय, पोवई नाका, श्री कुबेर विनायक मंदीर, शासकीय विश्राम धाम, विसावा नाका मार्गे परत नटराज मंदिर येथे झाली. सातारा येथील श्री शंकराचार्य मठ व श्री कृष्ण यजुर्वेद पाठशाळेतील  ब्रह्मवृदांनी  रथयात्रेच्या मार्गावर मंत्रोच्चार व वेदपठण केले. तसेच  पोवई नाका येथे के.एस.डी.शानभाग विदयालयाच्या मुला व मुलींच्या झंाजपथकाने सुरेख खेळ सादर केले, सायंकाळी पोवई नाका येथे स्केटिंग ग्रुपने आपली कला सादर केली. तसेव रथयात्रा मार्गावर विविध प्रमुख युवा मंडळे, तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनीही रथाची पूजा केली व दर्शन घेतले.
शहरातून मार्गक्रमण करत असलेल्या या मिरवणूकीत दिवसभर दर्शनार्थींनी  रथावर मोठी गर्दी केली होती.
रथाचे मंदिर प्रांगणात आगमन झाल्यावर सायंकाळी 7 वाजता जिल्ह्यातील विविध देवस्थान व तीर्थक्षेत्राचे महंत व मठाधिपती यांचे हस्ते रथातील देवतांची महामंगल आरती करण्यात आली. यावेळी काळभैरव देवस्थान ट्रस्टचे अधिकारी प्रकाश कुलकर्णी,त्रिपुटी देवस्थानचे प.पू. श्रीपाद महाराज, श्रीसत्यसाई सेवा समिती साताराचे प्रमुख शशिकांत शिंदे उपस्थित होते.महाआरती होउन या सर्व मान्यवरांचा सत्कार मंदिराचे वतीने करण्यात आला.
उद्या मंगळवारी दि. 2 जानेवारी रोजी पहाटे 5 ते 12 यावेळेत श्री राधा-कृष्ण मेमोरियल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी या देवतांना महाभिषेक व कल्याणोत्सव व सायंकाळी श्री उमादेवींना चक्रावरण पूजा  संपन्न होईल. व त्यानंतर या सोहळयाची सांगता होणार आहे.