राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमाचा राज्यभर फज्जा… ; पाटण येथे पत्रकांरांनी काळ्या फिती लावून काळा दिवस पाळला

पाटण:- माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचा आज राज्यभर फज्जा उडाला. राज्यातील पत्रकारांनी पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने बहुतेक जिल्हयात एकही पत्रकार जिल्हा माहिती कार्यालयाकडं फिरकलाच नाही. त्यामुळं आपल्या कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुप्पहार घालून राष्ट्रीय पत्रकार दिनाचा उपचार पार पाडला गेला. तर पाटण येथे पत्रकारांनी काळ्या फिती लावून राष्ट्रीय पत्रकार दिन हा काळा दिवस पाळला. बहिष्कार आंदोलन यशस्वी केल्याबदद्ल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांचे आभार मानले.

पत्रकार संरक्षण कायदा विधिमंडळानं मंजूर केलाय पण त्याची अंमलबजावणी होत नाही, मजिठिया लागू कऱण्याचे आदेश सुप्रिम कोर्टानं देऊनही सरकार या आदेशाची अंमलबजावणी करीत नाही. मागच्या अधिवेशनात राज्य सरकारनं पत्रकारांसाठीच्या निवृत्ती वेतनाची घोषणा केली पण त्याचीही अजून अंमलबजावणी होत नाही. अधिस्वीकृती समितीचे नियम जाचक करून ग्रामीण भागातील पत्रकारांना त्यापासून वंचित ठेवण्याचा खटाटोप होत आहे शिवाय नवे जाहिरात धोरण आणून छोटया आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो आहे. या सर्वाबद्दल राज्यातील पत्रकारांमध्ये मोठाच असंतोष आहे. त्याचं प्रतिबिंब आजच्या आंदोलनात उमटलं आणि सर्वत्र बहिष्कार आंदोलन यशस्वी झालं. पाटण तालुका पत्रकार संघाने काळ्या फिती लावून राष्ट्रीय पत्रकार दिन हा काळा दिवस मानुण पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवंत लोहार, उपाध्यक्ष नितीन खैरमोडे, दिनकर वाईकर, सचिव विद्या नारकर, माजी अध्यक्ष शंकर मोहिते, बाळासाहेब पवार, विक्रांत कांबळे, जालिंदर सत्रे, जयभिम कांबळे, प्रकाश कांबळे, संदेश बनवसोडे, बाबासो सुतार, सिताराम पवार आदी पत्रकार उपस्थित होते.
हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम. देशमुख, किरण नाईक, सिध्दार्थ शर्मा, गजानन नाईक, अनिल महाजन, शरद पाबळे यांनी पाटण तालुका पत्रकार संघाला व राज्यातील पत्रकारानां मनःपूर्वक धन्यवाद दिले सरकारनं या बहिष्कार आंदोलनापासून बोध घ्यावा आणि २६ तारखेपुर्वी पत्रकारांच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन कऱणार आहेत असे एस. एम. देशमुख यांनी सांगितले आहे.