यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे 34 व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा

सातारा : येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या मैदानावर 34 व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धांना शनिवार दि. 25 पासून  सुरूवात होत आहे. स्पर्धेत 22 राज्यातील मल्लखांब संघ सहभागी झाले असून सुमारे 450 खेळाडू यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये दाखल झाले आहेत. स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण झाली असून शनिवारी सकाळी या स्पर्धांना सुरूवात होणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते 11.30 वा. स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
सातारा शहराजवळ यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या स्पर्धांसाठी देशभरातून खेळाडू सातारा शहरामध्ये दाखल झाले आहेत.
गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, ओरिसा, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील खेळाडूंचे संघ दाखल झाले आहेत. त्याबरोबरच त्यांचे सुमारे 60 प्रशिक्षकही सातार्‍यामध्ये दाखल झाले आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या माध्यमातून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय संघ आणि राज्य संघाचे पदाधिकारी स्पर्धेच्या ठिकाणी पोहचले असून शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस चालणा-या या राष्ट्रीय स्पर्धांचे सातारा शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा मल्लखांब असोसिएशन आणि यशोदा टेक्निकल कॅम्पसच्यावतीने करण्यात आले आहे.