रविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’

पाटण : वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा तरच आपले जीवन सुखकारक होईल हा संदेश देत राज्यात सुख-शांती नांदावी यासाठी निसर्गाला खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून जेजुरीतील मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भाविक-भक्तांसह मणदुरे, ता. पाटण येथील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडीजवळील उंच काऊदर्‍यावर रविवार दि. 5 रोजी सकाळी 8.30 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत निसर्गपूजेचा सोहळा साजरा होणार असल्याची माहिती मार्तंड जानाईदेवी पालखी सोहळा, पाटण तालुका पत्रकारसंघ आणि सुराज्य प्रतिष्ठान पाटण यांच्यावतीने देण्यात आली.
पर्यावरणाचा र्‍हास, प्रचंड वृक्षतोड, जंगलतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यातच प्रदूषण, खेड्यातून होणारे सिमेंटचे जाळे, परंपरा, संस्कार जपणार्‍या खेड्यांचे वाढते आधुनिकीकरण यामुळे झालेली बेसुमार वृक्षतोड या कारणांनी शुध्द हवा मिळणेही अवघड झाले आहे. जिल्ह्यातील पाटण, तारळे, सातारा निसर्गप्रेमी आणि समस्त जेजुरीकर गावकर्‍यांनी आपली शेकडो वर्षाची धार्मिक यात्रा उत्सव पालखी परंपरेला गेल्या काही वर्षात पर्यावरण रक्षणाची  जोड देवून जनजागृती करत वसुंधरा उत्सव साजरा केला जात आहे. आपल्या धार्मिक परंपरा व श्रध्देनुसार हजारो मित्र सह्याद्रीच्या उंचकड्यावरून निसर्गपूजा साजरी करण्याकरीता काऊदर्‍याकडे निघाले आहेत. जेजुरीची ग्रामदैवता असलेल्या जानाईदेवीची पायी पालखी पद यात्रेचे जेजुरी येथून प्रस्थान झाले असून ही पालखी पाटण खोर्‍यात दाखल होण्याच्या मार्गावर आहे.
जानाईदेवी अन्नदान पदयात्रा सेवा आणि जेजुरी ग्रामस्थ यांच्यावतीने दि. 5 मार्च रोजी होणार्‍या निसर्ग पूजेला हजारो लोक हजेरी लावतात. जेजुरी येथून धार्मिक विधीपूर्वक चांदीच्या रथासह पर्यावरणाचा संदेश देणार्‍या पारंपारिक बैलगाड्यांचा ताफा पूजेकरीता रवाना झाला असून सुमारे दीडशे किलोमीटरचा जयाद्री ते सह्याद्री असा प्रवास करत भाविक प्रथम निसर्गपूजेला काऊदरा येथे जातात व तद्नंतर मुक्कामी जानुबाई निवकणे येथे जातात. या निसर्गपूजेत येथील डोंगरवासी महिलांना साडीचोळी आणि वृक्ष देवून सन्मानित केले जाते. तर वसुंधरेला भंडारा उधळून हरितक्रांती व पर्जन्यवृष्टीकरीता प्रार्थना केली जाते, अशी माहिती मार्तंड जानाईदेवी पालखी सोहळा जेजुरी अन्नदान सेवा ट्रस्टमार्फत देण्यात आली.
कार्यक्रमास पाटण तालुक्यातील निसर्गप्रेमींनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.