मोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे! ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या कर्तबगारीची..

लेखन:- सौ. यशस्वीनीदेवी सत्यजितसिंह पाटणकर

शेतात राबणारे आई-वडील…शिकण्यासाठी पैसे नाहीत म्हणून वर्षभर शिक्षण सोडून घरी बसावे लागणाऱ्या…तरीही परिस्थितीला भिक न घालता स्वतःच्या प्रगतीची वाट स्वतःच शोधणाऱ्या…’शुभांगी मोरे’ यांची नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक(PSI) या पदासाठी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!

पाटण तालुक्यातील कुठरे या छोट्याशा खेड्यामध्ये शेतकरी कुटुंबात शुभांगी यांचा जन्म झाला. शुभांगी कुटुंबातील तीन भावंडांमध्ये थोरल्या, ग्रामीण भागात एक म्हण आहे, *”पहिली बेटी…धनाची पेटी!”* खरोखरच आज शुभांगी पोलीस अधिकारी झाल्यावर ही म्हण सार्थक झाली आहे. घरची परिस्थिती बेताचीच असली तरी आई-वडील आपल्या मुलांना शिकवत होते. शुभांगींचा एक भाऊ मुबंईमध्ये इंजिनिअरिंग करत होता, तर शुभांगी आणि दुसरा भाऊ कॉलेज करत होता. आपल्या लेकीने शासकीय अधिकारी व्हावे असे वडिलांना नेहमीच वाटायचे. शुभांगी सुद्धा लहाणपणापासून अधिकारी होण्याचेच स्वप्न पहात होत्या.

पण म्हणतात ना सर्व सोंग घेता येतात पण ‘पैशाचे’ सोंग कधीही आणता येत नाही. गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणी येत होत्या, त्यातच अचानकपणे वडिलांच्या शरीरात पाणी होऊ लागले. सर्व भावंडे आई सोबत शेतात राबत होती पण खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. वडीलांचे आजारपण बळावले, इतर दोन्ही भावंडाचा शिक्षणाचा खर्च होताच. शेवटी थोरल्या बहीणीने आपले कर्तव्य निभावले, शुभांगींनी आपल शिक्षण अर्धवट सोडले. पण अधिकारी बनण्याचे स्वप्न गप्प बसून देत नव्हते. शिक्षण घेण्याची तळमळ अजूनही कुठेतरी जागृत होती.

एके दिवशी त्यांना माहिती मिळाली कि आपल्या सारख्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, अशा विद्यार्थ्यांना *’दिपस्तंभ’* ही संस्था मोफत मार्गदर्शन देते. शिवाय विद्यार्थ्यांच्या राहणाच्या,जेवणाचा खर्च सुध्दा हिच संस्था करते. खरचं अशा संस्था महाराष्ट्रात निर्माण व्हायला हव्यात ज्यामुळे असे अनेक अधिकारी घडतील.
त्यांनी या संस्थेची प्रवेश परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या आता स्पर्धापरीक्षांच्या तयारीसाठी जळगावला जायचे होते. सहाजिकच पाटणसारख्या ग्रामीण भागात एकट्या मुलीला परगावी पाठवायचे म्हटले की, कुटुंबात नकारात्मक चर्चा चालू होते. पण वडिलांना आपल्या मुलीचे स्वप्न, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी माहिती होती. त्यांनी तिच्या मनाची घालमेल ओळखली. वडिलांनी त्यांना एकदाच विचारले “तुला जायचे आहे का ?” शुभांगींनी होकारार्थी मान हालवली.

दिपस्तंभमध्ये आल्यानंतर शुभांगी आपल्या ध्येयाविषयी अधिकच जागृक झाल्या. *”आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो यापेक्षा आपण जन्माला येऊन काय केल ? काय मिळवले ?”* हे त्यांना जास्त महत्त्वाचे आहे. असे समजून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सर्व प्रथम त्यांनी ८ वी ते १० वी ची महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके वाचून समजावून घेतली कारण तोच *MPSC* चा खरा पाया आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विषयाच्या सखोल ज्ञानासाठी त्या त्या विषयांची संदर्भ पुस्तके (रेफरन्स बुक)अभ्यासायला सुरवात केली.
सतत आपल्या ध्येयाला चिटकून राहता यावे म्हणून थोर लोकांची चारित्रे वाचायला सुरवात केली. त्यामुळे एक अशी भावना जागृत झाली कि,जर हे लोक एवढ्या बिकट परिस्थितीतून येऊन हे सर्व करु शकतात तर मी का नाही ? पोस्ट मिळवलेल्या विद्यार्थ्यांची व्याख्याने ऐकली. जेवतानाही मित्र-मैत्रींणसोबत अभ्यासाविषयच गप्पा व्हायच्या किंवा एखाद्या चालू घडामोडीवर चर्चा व्हायची त्यामुळे जनरल नॉलेजची तयारी चांगली होत होती. थोडक्यात शुभांगींनी *MPSC* ला आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडले.
या अभ्यासाच्या काळात त्यांनी स्वतःला वाद, सणसमारंभ, कार्यक्रम, दंगामस्ती यापासून दुर ठेवले. कारण त्या नेहमी विचार करायच्या कि, *यामुळे माझा परिक्षेतील एखादा मार्क वाढणार आहे का ? नाही ना ? मग मी हे का करु ?* यामुळेच शुभांगी आपल्या ध्येयाला सतत चिटकून राहील्या. पण कधी-कधी जर कंटाळा आला, अभ्यास करण्याची इच्छा नसेल तर मस्तपैकी जवळच असणाऱ्या एका बागेत जाऊन बसत किंवा चित्रपट पाहायचा प्लान व्हायचा.
दिपस्तंभमध्ये चांगली तयारी झाली, परीक्षा दिली. अभ्यास चांगला झाल्यामुळे यशाची खात्री होती. पण दुर्दैवाने परीक्षेचा निकाल ठरलेल्या तारखेला जाहीरच झाला नाही. काही कारणास्तव या भरती संदर्भात खटला कोर्टात गेला होता. ६ महीने उलटून गेली तरी परीक्षेचा निकाल लागण्याची चिन्हे दिसत नव्हती. आता पुन्हा नैराश्य येत होते. आई धीर देत होती *”असुदे काहीही होऊदे, पुन्हा तयारी कर…पुढील परीक्षा दे…एकदा पाण्यात पडल्यावर पोहायला शिकायचेच!”* पण मनातुन निराशा वाटत होती केलेली एवढी मेहनत वाया जाणार असेच वाटत होते. सरते शेवटी ८ महीन्यांनी निकाल लागला…शुभांगी मोरे पोलीस उपनिरीक्षक(PSI) झाल्या होत्या.
हा माझा तिसरा लेख आहे पण मला कुठेतरी असे वाटते कि मुलगा आणि मुलगी असा फरक कुठेही नाही….मुलाप्रमाणे मुलगीही आई-वडीलांची स्वप्ने पुर्ण करु शकते फक्त तिच्यावर विश्वास ठेवण्याची आज गरज आहे. शुभांगी सांगतात कि वडीलांची परिस्थिती गरीब आहे म्हणून त्यांचे मामा त्यांना लागेल त्यावेळी आर्थिक मदत करायचे, त्यांचा भाऊ काम करुन त्यांना खर्चासाठी पैसे पाठवायचा, शुभांगींना मदत करणारी हि सर्व मंडळी पुरुषच होती. जर तुम्ही तुमचा द्रुष्टीकोण बदलला तर आज समाजातील स्त्रियांचे जीवन बदलायला वेळ लागणार नाही.
निकाल लागल्यानंतर शुभांगींना फार काही विशेष वाटल नाही कारण, त्यांना माहिती होत आपण यशस्वी होणार, हे आपल्याला मिळणारच होतं, हे आपल्याच हक्काचे होते…गेली अनेक महिने केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. एवढा प्रचंड विश्वास फक्त आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून जिद्दीने प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्येच असतो…त्यापैकीच एक शुभांगी मोरे!
जेव्हा आपली लेक पोलीस अधिकारी झाली असे आईच्या कानावर पडले तेव्हा त्या माऊलीला भरुन आले, तिच्या डोळ्यातुन आंनद अश्रु वाहत होते. घरात पैसे नाहीत पण शिकायचे आहे , म्हणुन नातेवाईकांकडे पैसे मागणारी आपली मुलगी आज अधिकारी झाली होती. आज या मायलेकी आपल्या खडतर काळात मदत करणाऱ्या लोकांचे आभार मानताना जराही थकत नाहीत, हाच त्यांचा मोठेपणा आहे. गावातील लोक आज त्यांच्या आई-वडिलांना म्हणतात “खरचं तुम्हांला तुमच्या मुलांनी वर काढले…” शुभांगी त्यांना तत्काळ सांगतात, *”नाही आम्ही जे काही आहोत ते आमच्या आई-वडीलांचे उपकार आहेत! “* त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींना सांगतात कि *”परिस्थितीला दोष देत बसु नका कारण परिस्थिती तुम्हीच बदलु शकता…जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो…नाही तर एक दिवस परिस्थिती तुम्हांला बदलते.”*

शुभांगी तुम्हांला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप-खुप शुभेच्छा!

जाता जाता चार ओळी शुभांगी मोरेंसाठी:-

कधी होईल जित…कधी होईल हार।

मी ना घाबरणार…ना मागे हटणार।

मीच माझ्या आयुष्याची शिल्पकार… आणि चित्रकार।

नाही गाणार सुर निराशेचे…मी फक्त माझ्या स्वप्नांसाठी झटणार।।

 

(पाटण प्रतिनिधी- शंकर मोहिते.)