मूळपीठ डोंगरावर श्रीयमाईदेवीच्या अष्टमी उत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी

औंध : महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवीचा अष्टमी उत्सव येथील मूळपीठ डोंगरावर भाविकांच्या अलोट गर्दीत अपूर्व उत्साहात धार्मिक वातावरणात आई उदे, गं अंबे उदेच्या जयघोषात गुलाल खोबरे उधळून, सासणकाठ्या नाचवून प्रसाद वाटून साजरा करण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित येथील मूळपीठ डोंगरावरील श्रीयमाईदेवी, ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी, राजवाड्यातील कराडदेवी येथे नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे मागील सात दिवसांपासून करण्यात आले. यामध्ये मंत्रपठन, मंत्रपुष्पांजली, महाआरती याबरोबरच किर्तन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आठव्या दिवशी यमाई देवीचा अष्टमी उत्सव मूळपीठ डोंगरावर असल्याने सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागातून तसेच कर्नाटक तसेच अन्य भागातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी मूळपीठ डोंगरावर प्रचंड गर्दी झाली होती.
दुपारी मूळपीठ डोंगरावर अष्टमी उत्सवानिमित श्रीयमाई देवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींच्या हस्ते देवीच्या उत्सव मूर्तीचे षोडषोपचारे पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्यपठन गणेश इंगळे यांनी केले.
त्यानंतर वादयव्रूंदाची सलामी देऊन पालखी मंदिर प्रदक्षिणा सुरु झाली. यावेळी विविध गावच्या मानाच्या सासनकाठ्या श्रध्देने नाचविण्यात आल्या. यावेळी तेलभूते, ढोल, सनई, हलगीवादकांनी तसेच कलाकारांनी आपली सेवा देवी चरणी सादर केली. पालखी प्रदक्षिणेवेळी मूळपीठ डोंगरावरील दत्त मंदिर, देवीच्या पादुका, घाटशिळ, बनबुवा तसेच पालखीने भेटी देऊन त्याठिकाणी मानाचे पानसुपारीचे विडे ठेवून पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उपस्थित हजारो भाविकांना केळी,पेरू, काकडी आदी फळांचा प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर पुन्हा  देवीच्या उत्सव मूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. वाद्यव्रूंदाची सलामी देण्यात आली.

 

अष्टमीउत्सवानिमित पं. स. सदस्या सोनाली खैरमोडे, सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, शंकरराव खैरमोडे, वसंत देशमुख, प्रकाश पवार, दिपक कदम, प्रशांत खैरमोडे, उमेश थोरात,प्रकाश पवार, शामपुरी महाराज,मधुरा टोणे,रवींद्र थोरात, शहाजी यादव विविध मान्यवर, देवीचे सर्व मानकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.