कराडला 2006 ची पुनरावृत्ती, कृष्णा-कोयनेला महापुर

सतत पडणारा पाऊस व कोयना धरणातील पाणी विसर्गाने गंभीर परस्थिती
कराड : रात्रंदिवस पडणार्‍या पावसाच्या सरी, कोयना व इतरत्रच्या धरणातुन होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे कृष्णा कोयना नदीपात्रातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुन्हा 2006 ची पुनरावृत्ती झाली आहे. आज कराड शहराच्या जवळुन वाहणार्‍या नदीपात्रातील पाणी शहराला भीडले आहे. दत्तचौक, साईबाबा मंदीर, कोयना दुधसंघ कॉलनी, पाटण कॉलनी, घाटावरील बालाजी मंदीराजवळील रस्त्याला.फ पाणी येऊन थडकले आहे. तसेच प्रतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण समाधी जलमय झाली आहे. एकुणच निर्माण झालेल्या परस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
गेल्या 15 दिवसापासुन पावसाला उसंत नाही. सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. अतिवृष्टीमूळे कन्या शाळेची संरक्षण भिंत पडली आहे. पाटण कॉलनीतील झोपडपट्टीत पाणी शिरल्याने तेथिल लोकांचे स्थलांतर येथिल नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आले आहे. दत्तचौकातील साईबाबा मंदिर,तसेच शिवाजीमहाराज पुतळयाजवळील पाटील प्लाझा इमारतीला पाणी लागले आहे. विश्रामगृहाजवळ असलेल्या कोयना दुध संघाच्या कॉलनीत पाणी शिरले आहे. तसेच घाटावरील नाना नानी पार्कमध्ये पाणी आले आहे. घाटावरील बागेलाही पाण्याने वेढा घातला आहे. हीच परिस्थिती 2006 साली झाली होती. त्यावेळी पावसाने उघडीप दिल्याने पुढील अनर्थ टळला होता. मात्र तसे यावेळी दिसुन येत नाही. आजही पावसाच्या संतंतधार सरी पडत आहेत. त्यातच कोयना धारणातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालु राहिल्याने कराड व नदी काठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. कोयना नदीच्या पलिकडील बाजुस असलेल्या अन्नपुर्णा हॉटेल व बाजुच्या परिसरात पाण्याने शिरकावं केला आहे. नदी पात्रातील पाणी पातळी अशीच वाढत राहिली तर पुणा-बेंगलोर महामार्गावरही पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडतच होत्या. या परिस्थितीतही नदीला आलेला महापुर पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. दरम्यान तालुक्यातही बहुतांश गावातापाणीच पाणी झाले आहे. तेथीलही काही गावांची परिस्थीती चिंताजनक आहे. या गंभीर बनत चाललेल्या परिस्थितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसदल नगर पालिका कर्मचारी, महसुल विभाग कर्मचारी, बचाव कार्याचे पथक कार्यरत झाले आहेत.