सरकारने पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून द्यावीत : शरद पवार

कराड : महापुरामुळे अनेक लोकांच्या घरांची पडझड झाली आहे. चार-पाच दिवसांपासून पाण्याखाली असलेली घरेही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ज्या भागात जमिनी खचल्या आहेत, तेथेही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लातूर भूकंपावेळी सुमारे एक लाख घरे पडली होती. मात्र, त्या वेळी आम्ही आठ महिन्यांच्या आता भूकंपग्रस्तांना घरे बांधून दिली होती. त्या धर्तीवर या सरकारनेही पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून देण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
महापुराची पाहणी करण्यासाठी आले असता येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. मदनदादा पाटील, आ. बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार म्हणाले, या महापुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शेतकरी, व छोटे दुकानदार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. शिवाय बाधित लोकांना अन्नधान्य, कपडे, ब्लांकेट्स अन्य आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. तसेच पुरामुळे ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यावरील सर्व कर्ज सरकारने तात्काळ माफ करणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच या पुरामुळे स्थानिक लोकांनी मोठी मदत केली. कराड, पाटण भागात खूप नुकसान झाले. त्यामुळे या भागात काही मदत लागल्यास कालवा, त्यांना पक्षातर्फे मदत करण्याचा प्रयत्न करू, असे आ. बाळासाहेब पाटील यांना सांगितेले होते. मात्र, या भागात स्थानिकांनी मोठ्या प्राणात मदत केली असून काही मदत लागल्यास कळवू, असे त्यांनी सांगितले. यावरून सरकार काही करू शकत नाही हे लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे मदत करण्यास सुरुवात केली. मात्र, अजूनही सरकारला जग आली नसून लोक त्यांना नक्की धडा शिकवतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी आमदार, पदाधिकार्‍यांनीही अन्य मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये विविध नुकसानीबाबात तात्काळ पंचनामे करणे गरजेचे असून त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवकांना शासनाकडून त्यासंदर्भात अजून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण, कोयना, नवजा, महाबळेश्वर, वाई या भागांमध्ये जमिनी खचल्यामुळे घरांचे व शेतजमीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी, असा मुद्दा आ. पाटणकर यांनी उपस्थित केला. तसेच बोरगेवाडी ता. पाटण या गावाचे काही वर्षापूर्वी पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र, सततच्या पावसामुळे नवीन गावठाणची जागाही खचली असून आता त्या गावाचे पुन्हा दुसरीकडे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. पाटण भागात वारंवार होणार्‍या भूकंपामुळे, त्यात पाऊस आणि अन्य आपत्तीमुळे या जमिनी लवकर खचतात. त्यामुळे येथे काही गावांचा वारंवार पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
यावर पवार म्हणाले, त्यांचे डोंगरी भागात ज्या ठिकाणी जागा शिल्लक असेल त्या ठिकाणीच त्यांचे पुनर्वसन करण्यात येऊ शकेल. त्यांच्या शेतजमिनीही याच भागात असल्याने अन्यत्र त्यांचे पुनर्वसन केल्यास त्यांना दुसरीकडे पूर्वी एवढ्याच शेतजमिनी देणे शक्य होणार नाही.णे शक्य होणार नाही.