पाटण तालुक्याची लेक अर्चना… सलाम तिच्या जिद्दीला ; हात नसलेली अर्चना सोडविते 10 वीचे पेपर

पाटण (शंकर मोहिते) : पंधरा वर्षांपुर्वी चुलीच्या निखार्‍यात दोन्हीही हाताची दहाही बोटं जळून खाक झालेली मुलगी. दोन्ही मनगटात पेन धरुन दहावीचे बोर्डाचे पेपर लिहीत असलेली अर्चना सिदु यमकर गवळीनगर कोकिसरे, सिदू धुळा यमकर यांची कन्या सध्या मोरणा विद्यालय, मोरगिरी ता. पाटण या शाळेत इ. 10 वी च्या वर्गात शिकत आहे. ती नुकतीच सुरु असलेल्या मार्च 2019 एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत पेपर सोडवत आहे.
अर्चना नुकतीच रांगायला लागलेली लहान चिमुरड्या मुलीला लहान भावंडांच्या आधारावर सोडून आईवडील मजुरी कामा करीता शेतात गेले असताना घरात मोठं माणुस कोणीच नव्हत. त्यावेळी ती मुलगी खेळत खेळत चुली जवळ गेली आणि रखरखीत विस्तवाचे निखारे असलेल्या चुलीत दोन्ही हात गेले आणि मनगटा पर्यंत दोन्हीही हाताची तळवे व दहाही बोट जळून खाक झाली.
वडीलांनी घरच्या बिकट परिस्थितीमुळे घरगुती उपाय सुरू केले होते. आणि आज.. तीच मुलगी डोंगरकपारींतून पाऊल वाटेने गवळीनगर ते मोरगिरी चालत दहावीची परिक्षा देत आहे. तिच ही दुर्दैवी मुलगी. जीने दुर्देवा बरोबर परिस्थिती वर मात करून दहावीचा पेपर दोन्ही मनगटात पेन धरून लिहिले आहे. सहा महीन्यापुर्वी अर्चना चे वडीलांचे निधन झाले आहे. तरीसुद्धा न डगमगता ती जिद्दीने शिकत आहे.
एस.एस.सी.बोर्डाकडुन तीला सहाय्यक रायटर घेण्याची सुविधा आहे. पण अर्चनाने ती सुविधा नाकारत स्वताच्या हातानेच पेपर सोडवण्याचा हट्ट धरला. व इ.10 वी ची परीक्षा ती स्वतः देत आहे. दिली. अस्थिव्यंग असल्याने अर्चनास 20 मीनीट जादा वेळ बोर्डाने दिला आहे. पण इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ती पेपर सोडवत आहे. मोरणा विद्यालयातील शिक्षकांनी आजपर्यंत तीला सर्वकाही मदत केलीय पण तीला गरज आहे ती हातांची.
अर्चनाची लहान बहीण कु.सुनिता ही इ.9 वी च्या वर्गात मोरणा विद्यालयातच शिकत आहे. सुनिता अर्चनाची सर्व कामे करते तीची कपडे वेणी जेवण व अन्य कामे सुद्धा लहान बहीण सुनिताच करत असल्याने अर्चना आज इथपर्यंत पोहचली आहे. कु.अर्चना हुषार तर आहेच पण तीचे हस्ताक्षर सुद्धा सुंदर आहे.विद्यालयातील अनेक उपक्रम व कार्यक्रमात तीचा सहभाग असतो. दोन्ही हातांनी अपंग असलेली व शिक्षणासाठी जिद्दी असलेल्या आर्चनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.