आ. जयकुमार गोरे हे माण तालुक्यातील गावगुंड

श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांचा टोला
फलटण : माणचे आ. जयकुमार गोरे हे नुसते प्रसिद्धीसाठी हापापलेले असून श्रीमंत रामराजे यांच्यावर टीका केली की त्यांना प्रसिद्धी मिळती. श्रीमंत रामराजे यांच्यावर टीका करण्याची जयकुमार गोरे यांची पात्रता नसून जयकुमार गोरे हे माण तालुक्यातील गावगुंड असल्याचा आरोप करत जनता ह्यांना कधीच महत्व देणार नाही असा टोलाही पंचायत समितीचे सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आ. जयकुमार गोरे यांना लगावला.
या वेळी बोलताना श्रीमंत विश्वजितराजे म्हणाले की, जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यामध्ये किती व कोणते तिर मारले आहेत हे सर्व जनतेला ज्ञात आहे. जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात कसलाही विकास झाला नाही. त्याच्या उलट श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटण मतदारसंघात भरघोस विकास झाला असून पूर्वी शिरवळ वरून फलटणला येताना ओसाड राने पडून होती आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या दिमाखात दिसत आहेत व सुरू आहे. ह्या कंपन्यांमध्ये हजारो मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फलटण तालुक्याबद्दल कोणीही कितीही टीका केली तरी हे सर्वांना ज्ञात आहे की फलटण व खंडाळा हे तालुके श्रीमंत रामराजे यांच्यामुळेच ओलिताखाली आले आहेत. अशी अनेक विकासकामे श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत.
आ. जयकुमार गोरे यांच्यात हिम्मत असेल तर फलटण व माण तालुक्याचा विकासाची तुलना करावी. ह्या मतदारसंघाची तुलना होवू शकत नाही हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. श्रीमंत रामराजे यांनी केलेली विकासकामे सांगायची झाली तर पुढील काही दिवसाचे अंक पुरणार नाहीत. घाट उतरून दुसर्‍याच्या घरात लक्ष देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघात लक्ष दिले तर त्यांनाच बरे होईल. माण तालुक्यातील शिक्षित उद्योगपती जयकुमार गोरे यांना घाबरत असून माण मधील सुशिक्षित नागरिकांनी पुण्यामुंबईची वाट धरली आहे. जयकुमार गोरे यांच्या सुंदर चारित्र्यामुळे माण तालुक्यातील महिलावर्ग दुपार नंतर घराबाहेर पडत नाहीत. जयकुमार गोरे यांना जनतेशी काही देणेघेणे नसून प्रसिद्धीसाठी श्रीमंत रामराजे यांच्यावर टीका करत असल्याचे श्रीमंत विश्वजितराजे यांनी स्पष्ट केले.
जयकुमार गोरे यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांमध्ये माण मतदारसंघात कसलाही विकास केला नाही. त्यांनी नेमके काय केले हे तरी जनतेला त्यांनी सांगावे. निवडणूक जवळ आल्याने पाण्याचा मुद्दा उपस्थित करून मते मिळवण्याचा केविलवाणा प्रयन्त जयकुमार गोरे करत असून ह्या वेळी माण तालुक्यातील जनता ह्या वेळी जयकुमार गोरे ह्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असेही श्रीमंत विश्वजितराजे यांनी स्पस्ट केले.
आगामी काळामध्ये माण मतदारसंघातुन एक सुसंस्कृत नेता निवडून येईल याची सर्वांना खात्री आहे. आपले आमदारकीची दोन महिने व्यवस्थित काढावीत कारण आगामी काळामध्ये जयकुमार गोरे यांचा पराभव होणार हे नक्की आहे. श्रीमंत रामराजे यांच्यावर बोलण्याची जयकुमार गोरे यांची उंची नाही. गोरे यांच्या राजकीय फालतूगिरीचा अंत जवळ आला आहे. लहान मुलासारखे वागणे बंद करा. तुम्ही बोबडे असल्याने जनतेला काय बोलता हे ही नीट कळत नाही असा टोलाही श्रीमंत विश्वजितराजे यांनी लगावला.