दीपक पवार राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

सातारा : पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष नेते दीपक पवार हे येत्या 22 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरूवारी दीपक पवार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने राजकीय उलथापालथीच्या शक्यतेने पुन्हा वेग घेतला आहे.
दीपक पवार, यांच्यासह सेनेचे सदाशिव सपकाळ, एस एस पार्टे गुरूजी, अमित कदम यांनी शिवेंद्रराजे यांना उमेदवारी दिल्यास विरोधात काम करणार असा इशारा भाजपला दिला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेंद्रराजे यांची उमेदवारी मंचावरुन जाहीर केल्याने पवार गटाची अस्वस्थता वाढली आणि सातार्‍यात पुन्हा मंगळवारी रात्रीपासून हालचालींना वेग आला आणि दीपक बापूंनी आमदारकीसाठी राष्ट्रवादीचा पर्याय निवडावा हा आग्रह समर्थकांचा वाढू लागला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार हे सातार्‍यात असून त्यांच्या उपस्थितीत पवार हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दीपक पवार गुरूवारी पत्रकारांना सामोरे जाणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रवेशानंतर तत्काळ दिपक पवार यांना सातारा – जावळी विधानसभेसाठी राष्ट्रवादी तर्फे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. याच अनुषंगाने पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत ही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
सातारा – जावळी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे दिपक पवार हे प्रभळ दावेदार होते. मात्र राष्ट्रवादीचे आ.शिंवेंद्रराजे यांनी भाजप प्रवेश करून दिपक पवार यांच्या उमेदवारीवरच घाला घातला.
दिपक पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले तरीही पक्ष श्रेष्ठीनीं यांची साधी दखल ही घेतली नाही. तसेच सातार्‍यात जनादेश यात्रेला आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिपक पवारांच्या समोरच शिवेंद्रराजेंची उमेदवारी जाहीर केली.
या सर्व घडामोडींवर नाराज झालेले दिपक पवार यांनी दोन दिवसांपुर्वी पुणे येथे नुकतीच शरद पवार यांची भेट घेवून राष्ट्रवादी तर्फे सातारा-जावळी मतदार संघातून उमेदवारीची चर्चा केली. शरद पवारांनीही याला हिरवा कंदिल दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.