खा. उदयनराजे भोसले सातार्‍याची जागा राखणार

मकरंद देशपांडे व विनीत कुबेर यांची पत्रकार परिषदेत ग्वाही
सातारा : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीतील सर्व उमेदवार निश्‍चित विजयी होणार, खा. उदयनराजे भोसले दोन लाखाच्या मताधिक्कयाने सातार्‍याची जागा राखणार अशी ठाम ग्वाही महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारिणीचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, व विनीत कुबेर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा गुरुवारी दि. 17 रोजी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर दुपारी एक वाजता होणार आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत देशपांडे बोलत होते. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्ष माधवी कदम, दत्ताजी थोरात, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सिध्दी पवार, आदी उपस्थित होते. देशपांडे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत उदयनराजे भोसले यांना सातार्‍यात येण्याचा शब्द दिला होता. सातारा हे जिल्हयाचे मुख्यालय आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेचे सातार्‍यात आयोजन करण्यात आले आहे. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यात राजीनामा देऊन मोठे धाडस केले आहे. उदयनराजे यांचे प्रभाव क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे त्यांच्यासह आठ विधानसभा मतदार संघातील सर्व उमेदवार विजयी होतील.
सातारा जिल्हा हा भाजपचा गड व्हावा ही खरी आमची धडपड असल्याचे विनीत कुबेर यांनी स्पष्ट केले. युतीच्या उमेदवारांना सातारा जिल्ह्यात जनमत अनुकुल आहे त्यासाठीच भाजप ने अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने सातार्‍यात परिवर्तनाची लढाई निर्णायक टप्प्यात आणली आहे. युतीच्या प्रचाराला सातारा जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा देशपांडे यांनी केला. रिपाई व मित्रपक्ष यांची नाराजी असल्याच्या वृत्ताचे देशपांडे यांनी खंडन केले.
सातारा जिल्हयात होणार्‍या मोदी यांच्या सभेला स्वतः रामदासजी आठवले उपस्थित राहणार आहेत. जिल्हा स्तरावर जर कोणाची नाराजी असेल तर ती नाराजी मिटवली जाईल. सातार्‍यात मोदी यांच्या सभेला सुमारे एक लाख श्रोते जमतील असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर आच्छादित मांडव उभारण्यात आला असून व्हीआयपी व्यक्तींची जय्यत सोय करण्यात आली आहे. एसपीजी, सह विशेष सुरक्षा पथक एनआयए सुरक्षा यंत्रणांनी सभा स्थळाला वेढा दिला असून दोन लष्करी हेलिकॉप्टरची सातार्‍यावर हवाई टेहळणी सुरू आहे. मैदानावर सुरक्षित डी च्या पलीकडे व्हीआयपी व श्रोत्यांची व्यवस्था करण्यात आली असून मैदाना लगतच हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतुकीत मोदींच्या सभेमुळे बदल – बॉम्बे रेस्टॉरंट चौक विसावानाका, गोडोली नाका, झेडपी चौक, बांधकाम भवन, होवाळे हॉस्पिटल, कनिष्क हॉल मार्ग कडून सैनिक स्कूलला जाणार्‍या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. बांधकाम भवन ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दुतर्फा वाहतूक व पार्किंगला प्रतिबंध करण्यात आला आहे. कनिष्क हॉल ते झेड पी चौक- अण्णासाहेब कल्याणी शाळा चौक मार्ग वाहतूक व पार्किंगला प्रतिबंध.
पर्यायी मार्ग कोणते? – पोवई नाका शिवाजी सर्कल पेंढारकर चौक, डीजी कॉलेज कडून बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणारी वाहतूक गोडोली नाका अजंठा चौक मार्गाने बॉम्बे रेस्टॉरंट चौकाला जातील. एसटी स्टॅन्ड व कनिष्क हॉल कडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाला जाणारी वाहतूक वाढेफाटा सदरबझार खेड फाटा मार्गे बॉम्बे रेस्टॉरंट अशी मार्गस्थ होतील. कोरेगाव बाजूकडून सातारा शहरात येणारी वाहने सोयीनुसार खेडफाटा व गोडोली नाक्याकडून शहरात प्रवेश करतील.
पार्किंग व्यवस्था – पशुवैद्यकीय दवाखाना भोकळे मैदान – ठक्कर सिटी मागील मोकळे मैदान – इरिगेशन यांत्रिक विभाग मोकळे मैदान -जरंडेश्वर नाका कोयना सोसायटी मोकळे मैदान – छ. शाहू क्रीडा संकुल, पोलीस परेड ग्राउंड, तालीम संघ मैदान, जुने गोळीबार मैदान, कोडोली जि.प. शाळा मैदान, क्रांती स्मृती विद्यालय मैदान – कला वाणिज्य महाविद्यालय मैदान – कोटेश्वर मैदान – भूविकास बँक मैदान, शानभाग विद्यालय मैदान – लक्ष्मी विलास हाईटस -यशोदा शैक्षणिक संकुल- रिमांड होम इत्यादी.