शेतकर्‍यांच्या मागण्या संदर्भात श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पंतप्रधानांना निवेदन देणार : बुधाजीराव मुळीक

सातारा : महाराष्ट्रात शेतीसाठी कोणतेही सक्षम यंत्रणा, यंत्रणा नसल्यामुळे 2006 पासून 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीवरचा जीएसटी कमी झाला नाही. इरमा कायद्यावर अद्याप अंमलबजावणी झाली नाही. देशात सध्या चौकटीबाहेर विचार करणार्‍या पक्षाची सत्ता असल्यामुळे उद्या दि. 17 श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती कृषीतज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बुधाजीराव मुळीक पुढे म्हणाले, गेली अनेक वर्ष शेती चे प्रश्न आहेत असेच आहेत ते सुटले नाहीत. शेती कायद्यापासून वंचित आहे. शेतकर्‍यांना फायदेशीर असा कोणताही कायदा नसल्याने त्यांची अडचण होत आहे. शेतीला पाणी द्यावे, विज वेळेवर द्यावी, शेतकर्‍यांच्या मालाला शेती उत्पादन आधारावर किंमत द्यावी असा कोणताही कायदा नाही. पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाच्या विमा उतरता येत नाही. याउलट अमेरिका, जपान, इस्राईलमध्ये या देशांमध्ये कोणत्याही कारणाने शेतीचे नुकसान झाले तर शेतकर्‍याला मदत करणे हे तेथील शासन आपली वैज्ञानिक जबाबदारी मानते. याच धर्तीवर भारतामध्ये काही कायदे करण्याची गरज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेती धोरणाबाबत मी समाधानी नाही असे सांगून बुधाजीराव मुळीक पुढे म्हणाले, कोणत्याही सरकारच्या शेतीच्या धोरणाबाबत सुद्धा मी समाधानी नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामध्ये शेती वाहून जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यासंदर्भात मी दि. 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरामुळे झालेल्या शेतीला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
शेतीवरचा जीएसटी कमी न झाल्यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. शेतीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे 2006 पासून आजपर्यंत राज्यात 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी आपल्या मृत्यूला कवटाळले आहे. शेतीवरचा जीएसटी शून्य करावा, हा कायदा लागू करावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन दि. 17 रोजी सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते देणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यावेळी म्हणाले, ऑगस्ट महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खास पथक पाठवले होते. पथकाने सर्वेक्षण करून नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून मुख्यमंत्री त्या अहवालाबाबत सकारात्मक आहेत. पुराचे पाणी दुष्काळी भागाला कसे वळविण्यात येईल यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.