लोकशाहीच्या उत्सवासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; शाहू स्टेडियमवरुन मतदान यंत्रणेसह 22 हजार कर्मचारी रवाना ; आठ मतदार संघात 25 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि 8 विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात 2978 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवरून रविवारी तब्बल बावीस हजार कर्मचारी येथील शाहू स्टेडियमवरून मतदान साहित्यासह रवाना झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत सूत्रांकडून माहिती देण्यात आली.
सातार्‍यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी 18 लाख 60 हजार तर आठ विधानसभा मतदार संघासाठी 25 लाख 34 मतदार मतदान करणार आहेत. अठरा ते एकोणीस वयोगटातील सर्वाधिक 78 हजार मतदार असून दुबार मतदार नोंदणी अभियानात अवघ्या तीनच महिन्यात तब्बल पस्तीस हजार मतदार वाढल्याचे मतदार यादींच्या अद्ययावती करणानंतर स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत बहुतांशी मतदान केंद्र तळमजल्यावर असून दिव्यांग मतदारांना रॅम्पची सोय करण्यात आली आहे. सातारा व कराड उत्तर मतदार संघात नऊ ठिकाणी पावसाने इमारती धोकादायक झाल्याने मतदान केंद्र बदलण्यात आली आहेत.
छत्रपती शाहू स्टेडियममध्ये प्रशासनाकडून मतदान केंद्रावरील प्रात्यक्षिकांची तयारी करून घेण्यात आली. सोमवारी होणार्‍या मतमोजणीसाठी बावीस हजार कर्मचार्‍यांचे ईव्हीएम मशीन प्रात्यक्षिक घेण्यात आले. केंद्रप्रमुख, निवडणूक अधिकारी चार सहाध्यक व तीन कर्मचारी असे नऊ कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्यात आले असून आठ विधानसभा मतदारसंघातील 2978 मतदान केंद्रांवर ही यंत्रणा सक्रीय राहणार आहे. मतदान प्रक्रिया सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शाहू स्टेडियमवरील तयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी घेतला. कर्मचार्‍यांना मतदान केंद्रांवर रवाना करण्यासाठी 475 वाहनांची सोय करण्यात आली होती. मात्र सोमवारी सातार्‍यात मुसळधार पाऊस झाल्याने वाळू टाकलेल्या स्टेडियममध्ये अक्षरशः चिखल झाला. त्यातूनच वाट काढत कर्मचार्‍यांना वाहनापर्यंत पोहचावे लागले. सातारा जिल्ह्यातीत 251 संवेदनशील मतदान केंद्रावर 415 सूक्ष्म निरीक्षकांसह 796 व्हिडियो चित्रिकरणाद्वारे वॉच ठेवणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
लोकसभा व विधानसभा मतदार संघासाठी उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे या आखाडयात 73 उमेदवार नशीब अजमावत असलेल्या या मतदारसंघात लोकसभेसाठी अठरा लाख साठ हजार मतदार व आठ विधानसभा मतदारसंघात पंचवीस लाख चौतीस हजार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लष्करात सेवेत असणारे सातारा जिल्हयातील 12,700 जवान असून त्यांचे पोस्टल मतदान होणार आहे. संपूर्ण मतदा रसंघात 251 मतदान केंद्र संवेदनशील असून तेथे जादा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. या केंद्रांवर साहित्यासह कर्मचारी रवाना झाले आहेत. या कर्मचार्‍यांना ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅट मशीन तसेच इतर मतदानाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
सातारा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर उभारलेल्या नियंत्रण कक्षात साहित्य वाटप प्रक्रिया पार पडली. जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर कर्मचारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रवाना झाले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी आर .एस. शिंदे यांनी दिली.
पावसामुळे कर्मचारी,शिक्षकांची प्रचंड तारांबळ झाली. नियंत्रण कक्षासाठी उभारण्यात आलेल्या मांडवातून प्रचंड पाणी येत होते. त्यामुळे आढावा प्रक्रिया बंदिस्त दालनात हलवण्याची वेळ आली. मतदान झाल्यानंतर आठ विधानसभा मतदार संघापैकी सहा विधानसभा मतदार संघातील मतांची मोजणी एमडीओ गोडाऊन सातारा एमआयडीसी येथे दि 24 रोजी होणार आहे. यासाठी त्रिस्तरीय बंदोबस्ताची रचना करण्यात आली आहे. पहिल्या स्तरावर आरपीएफ, दुसर्‍या स्तरावर सीआयएसएफ, तिसर्‍या स्तरावर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.