संविधान मोडीत काढणारे सरकार खाली खेचा : उदयनराजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन
सातारा : शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेले स्वराज्याचे स्वप्न राज्यघटना साकार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्षात आणले. ही घटना आणि संविधान मोडीत काढण्याचे पाप काही मंडळी करीत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी केंद्रातील सध्याचे सरकार खाली खेचा, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून खा.उदयनराजे भोसले निवडणूक लढवीत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या निर्धारनामा या निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन नगरपालिकेसमोरील यशवंत उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले.
संपूर्ण देशातील विविध जाती धर्मातील व्यक्तींना एकत्रित ठेवण्याचे काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांनी केल्याचे सांगून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले की, अनेक राष्ट्रांतीळ कायदे आणि राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशाला योग्य ठरेल, अशा राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली आहे. माणसाला माणूस म्हणून जाण्याचा अधिकार घटनेमुळेच प्रत्येकाला मिळाला आहे. घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र निर्माण कार्यामध्ये दिलेले योगदान अनमोल आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा राजवाड्यातील प्रतापसिंह हायस्कुलमध्ये झाले आहे. याचा तमाम सातारकरांना अभिमान वाटतो. त्यांच्या जयंतीदिनी माझ्या निवडणूक जाहिरनाम्याचे प्रकाशन होत असल्याचा मला अभिमानच वाटतो आहे.
चुकीच्या राजकारभारामुळे रशियासारख्या महासत्तेचीही शकले झाली. तसा प्रकार भारतात होऊ द्यावयाचा नसेल तर संविधानाचा आदर राखणार्‍या आणि जनसामान्यांची दुःखे जाणणार्‍यांच्या पाठीशी उभे राहा, सारे आवाहन करून खा. उदयनराजे म्हणाले की, देशातील प्रौढ आणि मध्यमवयीन व्यक्तींपेक्षा उद्याचे आधारस्तंभ असलेल्या बालकांचे भवितव्य घडविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यायला हवे.
या प्रकाशन समारंभावेळी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, ऍंड डी. जी. बनकर, जि. प. चे माजी सभापती सुनील काटकर, सातारा पालिका पाणीपुरवठा समितीचे सभापती श्रीकांत आंबेकर, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडीक, संदीपभाऊ शिंदे, मुरलीधर भोसले, शिरीष चिटणीस आदींसह प्रमुख पदाधिकारी आजी – माजी नगरसेवक, कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.