राजवाडा मंडईतील विक्रेत्यांच्या भाज्यांच्या पाट्या पुन्हा रस्त्यावर

वाहतुकीला अडथळा अन् पालिकेची गांधारीची भूमिका
सातारा : शहरातील राजवाडा मंगळवार तळे रस्त्यावर पोलिसांच्या धाकाने विक्रेते मंडईत बसत होते. मात्र, पोलिसांची पाठ फिरली भाज्यांच्या पाट्या घेऊन हे विक्रेते पुन्हा रस्त्यावर बसू लागले आहेत. पोलिसांची आरंभशूर कारवाई अन् पालिकेची गांधारीची भूमिका यामुळे पोलिसांच्या पुन्हा चुका, भाजीवाले बनले रस्त्याचे पालक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यापार्‍यांना आवश्यक असणाजया सर्व गोष्टी मंडईत उपलब्ध करून दिल्या. पूर्वी मंडईत पावसाळ्यात दुकानाच्या डोक्यावर प्लास्टिकची फाटकी कागदं बांधून भाजी विक्री केली जायची. काहीजण तर कोसळत्या पावसात डोक्यावर छत्री घेऊन व्यवसाय करत होते. अशा बिकट परिस्थितीत असलेल्या विक्रेत्यांना पालिकेने चकाचक मंडई बांधून दिली. पण रस्त्यावर बसण्यातच धन्यता मानणार्‍या काही मुठभर व्यावसायिकांमुळे अवघी मंडईच आता पुन्हा रस्त्यावर भरू लागली आहे.
पालिकेची पावती फाडण्याची वेळ टळून गेल्यानंतर टोपल्या आणि हातगाड्या घेऊन ही मंडळी राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर बसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि किरकोळ अपघात यांची संख्या वाढत आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी विक्रेत्यांना रस्त्यावर न बसण्याचं आवाहन गत सप्ताहात केले होते.मात्र, पोलिसांची पाठ फिरली की मंडळी पुन्हा रस्त्यावर येऊन भाजी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.
राजवाडा मुख्य चौकात भाजी विकणारे काही टेम्पो आणि अलिकडे काही हातगाड्याही लाईट लावून पालेभाज्या विक्री करत असल्याचे दृष्टीस पडतात. यामुळेही येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. गत सप्ताहात कारवाईची आरंभ शुरता केलेल्या पोलिसांना या विषयाचा आता विसर पडल्याचे जाणवते. रस्त्यावरील मंडईमुळे वाहतुकीची होणारी कोंडी फोडण्यापेक्षा येथील दादा पावत्या फाडण्यात आणि तरूणांना अडविण्यात व्यस्त असल्याचे दिसते. तर दुसरीकडे रस्त्यावर मंडई भरणं हा निव्वळ पोलिसांचाच विषय असून याकडे पालिकेने अक्षरश: दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर बसणाजया या व्यावसायिकांना येथे मज्जाव करण्यासाठी पालिकेतील कोणीच पुढे आले नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सकाळी फळे… रात्री भाजी…!
राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर सकाळी हंगामी व्यावसायिक हातगाड्यांसह उभे असतात. गेल्या काही दिवसांत सकाळच्या सत्रांत येथे आंबा, पपई, जांभूळ, फणस आदी फळं विकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
दिवस मावळतीला आला की ग्रामीण भागातून येणारे व्यावसायिकांना घरी जाण्याची ओढ लागते तर मंडईतील व्यापारी रस्त्यावर येण्याच्या तयारीत असतात. संध्याकाळी साडेपाच नंतर कांदे, बटाटे, लसूण, दुधी भोपळा अशा भाज्या घेवून हे व्यापारी बसतात.