पुरस्कर्त्यांनी यापुढेही मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी काम करावे : खा. शरद पवार

सातारा : महात्मा गांधींना आफ्रिका देशामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काळा माणूस म्हणून त्यांना हिनवले जात होते. मात्र भारतात परतल्यानंतर महात्मा गांधींनी परकीय राजवटी विरोधात मोठा संघर्ष उभा करून देशामध्ये इतिहास घडून दाखवला. अनेक देशांमध्ये आज महात्मा गांधींचा पुतळा पाहायला मिळतो. त्यांनी शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचे मुख्य काम केले. महात्मा गांधींचे काम खूप मोठे आहे. आज त्याच पद्धतीने पुरस्कर्त्यांनी मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी यापुढे काम करावे, असे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.
फुले-आंबेडकर साहित्य पंचायत, भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र व भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा यांच्यावतीने आज जकातवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. आ. अजित पवार, अरुण खोरे, अंकुश काळे, सुप्रिया सोळांकुरे उर्फ राणी जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खा. शरद पवार पुढे म्हणाले, अनेक लोक वर्षानुवर्ष विविध क्षेत्रात काम करीत असतात. काहींच्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. त्यांची तशी अपेक्षाही नसते. आज पुरस्कार मिळालेले अंकुश काळे हे पारधी समाजाचे आहेत. मी जेथून निवडणूक लढवतो तेथे पारधी समाजाची मोठी संख्या आहे. पारधी समाजाच्या समस्या जाणून घेऊन सरकार मार्फत त्यांना जमीन देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये जावे, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून द्यावीत असे अनेकदा वाटत होते. मात्र त्याकाळी पारधी समाज जवळ येत नव्हता. आज परिस्थिती बदलली आहे. पारधी समाजातील अनेक मुले आज चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेत आहेत.
खा. शरद पवार पुढे म्हणाले, आज ज्या राणी जाधव यांना पुरस्कार मिळाला आहे, त्यांचे वडील चळवळीमध्ये काम करत होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे विचार पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. राणी जाधव या त्यांचाच वारसा पुढे चालवत आहेत. जाधव याही पारधी समाजासाठी काम करत आहेत. पारधी समाजाला सन्मानाने जगता यावे यासाठी राणी जाधव यांच्या वडिलांनी पारधी समाजाची सोसायटी स्थापन करून त्यांना जमीन मिळवून दिली. अरुण खोरे यांनी विविध व्यक्तींवर लिखाण केले. विशेषता महात्मा गांधी यांच्या कार्यावर त्यांनी अधिक प्रकाश टाकला. आज ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांनी मूलभूत अधिकारापासून जे वंचित राहिले आहेत, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे काम यापुढेही करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सुप्रिया सोळांकुरे उर्फ राणी जाधव यावेळी म्हणाल्या, शरद पवार यांनी भटके-विमुक्त जमाती वर खुप प्रेम केले. आज त्यांच्या हस्ते माझा गौरव होत आहे याचा मनोमन आनंद होत आहे. माझ्या वडिलांनी भटक्या-विमुक्तांसाठी केलेले काम पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा.
अंकुश काळे म्हणाले, शरद पवार यांनी पारधी समाजासाठी केलेले काम खूप मोठे आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना कधीही सोडणार नाही. त्यांच्यामुळेच पारधी समाजाला घरे, रेशन कार्ड मिळाली.
अरुण खोरे यावेळी म्हणाले, शरद पवार भटक्या विमुक्त चळवळीशी जोडले गेले आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या समस्यांमध्ये ते खूप असते ने लक्ष घालायचे. प्रश्नांच्या मुळे आपण एखाद्या समाजाची एकरूप होतो, हे विविध विषयांवर लिखाण करताना मला तीव्र जाणवते. अनेकवेळा आंबेडकरी चळवळीबाबत भारतीय वृत्तपत्रात मी जेवढे लिहिले तेवढे कोणीही लिहिले नाही, असे सांगून मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर अन्याय झाला. त्यांना चळवळीशी जोडले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी अरुण खोरे यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार, अंकुश काळे यांना जीवनगौरव पुरस्कार आणि सुप्रिया सोळांकुरे उर्फ राणी जाधव यांना युवा साहित्य पुरस्काराने खा. शरद पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले.